सूक्ष्म सिंचन संच नमूने तपासणीला ‘खो’!
By admin | Published: August 18, 2016 12:25 AM2016-08-18T00:25:02+5:302016-08-18T00:25:02+5:30
अमरावती विभागात सूक्ष्म सिंचन संचाची नमूने तपासणीकडे कृषी विभागाचा कानाडोळा.
सुनील काकडे
वाशिम, दि. १७ : शासनाकडून अनुदानावळ शेतकर्यांना दिल्या जाणार्या सूक्ष्म सिंचन संचाचे वाटप करण्यापूर्वी अधिकृत कंपन्यांकडून पुरविल्या जाणार्या साहित्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविणे अनिवार्य आहे. मात्र, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमधील कृषी विभागाने या महत्वपूर्ण बाबीकडे कानाडोळा केला. परिणामी, गेल्या अनेक वर्षांंंंपासून संच पुरविणार्या कंपन्या गब्बर झाल्या असताना शेतकर्यांना मात्र निकृष्ट दर्जाच्या साहित्यावर समाधान मानावे लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शेतकर्यांना राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानातून ठिबक संच पुरविण्याचे काम केले जाते. यासाठी शंभराहून अधिक कंपन्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यातीलच पुणे येथील फिनोलेक्स प्लासान इंडस्ट्रिज लिमिटेड, जळगावमधील तुलसी एक्स्ट्रयुशन लिमिटेड, गुजरातमधील विशाखा इरिगेशन प्रा. लिमिटेड आणि नाशिक येथील ईपीसी इंडस्ट्रिज प्रा. लिमिटेड या चार कंपन्यांनी पुरविलेले सुक्ष्म सिंचन संचाचे साहित्य अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाल्याने ३0 जुलै २0१६ रोजी कृषी आयुक्तालयाने संबंधित चारही कंपन्यांचे परवाने रद्द करून आगामी १0 वर्षासाठी संच पुरवठय़ावर बंदी लादली. यावरून राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही सुक्ष्म सिंचन संचासंबंधीचे निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यासंदर्भात सजग राहून कृषी विभागाने वेळोवेळी संच नमुने घेवून कृषी आयुक्त कार्यालयामार्फत मांजरी येथील वसंतदादा शूगर इन्स्टिट्युटकडे तपासणीसाठी पाठविणे आवश्यक आहे. मात्र, प्राप्त माहितीनुसार अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा आणि वाशिम यापैकी एकाही जिल्ह्यातील कृषी विभागाने याकामी अद्याप पुढाकार घेतलेला नाही. यायोगे या गंभीर प्रश्नावर पांघरूण घालण्याचा प्रकार कृषी विभागातूनच सुरू असल्याचा आरोप शेतकर्यांमधून होत आहे.
*कोट्यवधी रुपयांचे अनुदानही रखडले!
सुक्ष्म सिंचन संचाचे नमुने तपासण्याकामी कृषी विभागाने प्रचंड उदासिनता बाळगली असताना दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातील १८ हजार शेतकर्यांचे २५ कोटी रुपये अनुदान २ वर्षांंंंपासून शासनाकडे प्रलंबित आहे.
- सुक्ष्म सिंचन संचाचा पुरवठा करणार्या कंपन्यांकडून पुरविल्या जाणार्या साहित्यांचे नमूने निश्चितपणे तपासणीला पाठविले जातात. २0१५ मध्ये २0 नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविले. त्याचा अहवाल मात्र अद्याप अप्राप्त आहे.
मुरलीधर इंगळे
उपविभागीय कृषी अधिकारी, वाशिम