पोषण आहारातील ज्वारी, नाचणीचे पदार्थ कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 01:38 PM2019-10-19T13:38:49+5:302019-10-19T13:38:53+5:30

योग्य नियोजनाअभावी ही योजना राबविण्यासाठी २५ टक्के तांदळाची कपात करून बाजरी, ज्वारी आणि नाचणीची मागणीच नोंदविता आली नाही.

Mid day meal; Distribution sorghum not implimented | पोषण आहारातील ज्वारी, नाचणीचे पदार्थ कागदावरच!

पोषण आहारातील ज्वारी, नाचणीचे पदार्थ कागदावरच!

Next

वाशिम: राज्य शासनाने गत चार महिन्यांपूर्वी शालेय पोषण आहारात बदल करून ज्वारी, बाजरी, नाचणीचे पदार्थ देण्याची योजना आखली होती. या योजनेची अंमलबजावणी आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून केली जाणार होती; परंतु योग्य नियोजनाअभावी ही योजना राबविण्यासाठी २५ टक्के तांदळाची कपात करून बाजरी, ज्वारी आणि नाचणीची मागणीच नोंदविता आली नाही. त्यामुळे ही योजना कागदावरच राहिली आहे.
शालेय पोषण आहार ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीकरिता विद्यार्थी संख्या मंजूर केली जाते. मंजूर विद्यार्थी संख्येनुसार प्रतिविद्यार्थी प्रतिदिन १०० ग्रॅम व १५० ग्रॅमप्रमाणे तांदूळ अथवा इतर धान्य मंजूर केले जाते. जिल्ह्यात सुमारे ३,०५८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या आहारात विविधता आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहारात ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या पदार्थांचा समावेश करण्याचा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच घेतला होता. या निर्णयानुसार पोषण आहारासाठी तांदळाच्या मागणीत २५ टक्क्यांची कपात करून त्याऐवजी ज्वारी, नाचणी, बाजरी या धान्याचा वापर करून विविध पदार्थ, पाककृती निश्चित करण्याच्या सूचनाही सर्वच जिल्हास्तरावर देण्यात आल्या होत्या. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आॅक्टोबर २०१९ ते मार्च २०२० या वर्षाकरिता ज्वारी, नाचणी व बाजरीची मागणी संचालनालयास विहित नमुन्यात सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. तथापि, आॅक्टोबर महिना अर्धा उलटला तरी, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक धान्याची मागणीच नोंदविण्यात आली नाही. योग्य नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार, या कारणांमुळे ही योजना कागदावरच राहिल्याची चर्चा आता पालक वर्गात सुरू आहे.
 

शालेय पोषण आहारातील बदलानुसार ज्वारी, बाजरी आणि नाचणीची मागणी नोंदविण्याच्या सूचना शासनस्तरावरून देण्यात आल्या होत्या. त्याच वेळी या संदर्भात स्वतंत्र सूचनाही निर्गमित होणार असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु अद्याप अशा कोणत्याच सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे ज्वारी, बाजरी, नाचणीचे पदार्थ वितरित होत नसून, पूर्वीच्या पुरवठ्यातून शालेय पोषण आहार देण्यात येत आहे.
- गजाननराव डाबेराव
प्र. उपशिक्षणाधिकारी, जि. प. वाशिम

 

Web Title: Mid day meal; Distribution sorghum not implimented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.