पशुपालकांना अनुदानावर मिळणार दुधाळ जनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 01:17 PM2019-06-17T13:17:33+5:302019-06-17T13:18:30+5:30
वाशिम : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०१९-२० या वर्षात पशुपालकांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून अनुदानावर दुधाळ जनावरे मिळणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०१९-२० या वर्षात पशुपालकांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून अनुदानावर दुधाळ जनावरे मिळणार आहेत. त्यासाठी अर्जदाराकडून १७ जून ते १६ जुलै २०१९ पर्यंत पंचायत समितीस्तरावर अर्ज मागविण्यात येत आहेत.
अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थ्यांना विशेष घटक योजना अंतर्गत तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थींना २ दुधाळ जनावरांचा ७५ टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येणार आहे. लाभार्थी निवड झाल्यानंतर एका महिन्यात संबंधित लाभार्थ्याला २१ हजार २६५ रुपये लाभार्थी हिस्सा चलनाद्वारे भरावा लागणार आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थ्यांना विशेष घटक योजनेतून तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थ्यांना आदिवासी उपयोजनेंतर्गत ७५ टक्के अनुदानावर १० शेळी व एक बोकड अशा गटाचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थ्याची निवड झाल्यास एका महिन्याच्या आत उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीसाठी १७ हजार ८१० व स्थानिक जातीसाठी ११ हजार ९६२ रुपये लाभार्थी हिस्सा चलनाद्वारे भरावा लागेल.
सर्वसाधारण योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर तलंगा गट वाटप योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ३ हजार किंमतीच्या २५ मादी व ३ नरचा समावेश असलेला तलंगा गट पुरविण्यात येणार आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकºयांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर वैरण बियाणे १०० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. या योजनेत प्रतिलाभार्थी ६०० रुपयेच्या मर्यादेत शेतकºयांना लाभ देण्यात येईल. सर्व योजनांचे विहित नमुन्यातील अर्ज संबंधित पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागात उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील गरजू व पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद कृषि पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आय. आर. खान यांनी केले.