अल्प पावसाचा शेतकर्यांना फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:06 AM2017-09-06T01:06:31+5:302017-09-06T01:06:44+5:30
पावसात सातत्य नसल्याने तसेच अल्प पावसाचा पिकांसह शेतकर्यांना जबर फटका बसत आहे. काही ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत तर हलक्या जमिनीवरील सोयाबीन हातचे जाण्याची भीती शेतकर्यांमधून वर्तविली जात आहे. या पृष्ठभूमीवर पिकांची पाहणी करून नुकसानभरपाईसंदर्भात शासनाकडे अहवाल सादर करावा, अशी मागणी जिल्हाभरातील शेतकर्यांमधून होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: पावसात सातत्य नसल्याने तसेच अल्प पावसाचा पिकांसह शेतकर्यांना जबर फटका बसत आहे. काही ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत तर हलक्या जमिनीवरील सोयाबीन हातचे जाण्याची भीती शेतकर्यांमधून वर्तविली जात आहे. या पृष्ठभूमीवर पिकांची पाहणी करून नुकसानभरपाईसंदर्भात शासनाकडे अहवाल सादर करावा, अशी मागणी जिल्हाभरातील शेतकर्यांमधून होत आहे.
कारंजा लाड: लाडेगाव येथील काही शेतकर्यांच्या जवळपास १00 एकर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाला शेंगा धरल्या नसल्याचे समोर आले आहे.
पिकांची पेरणी झाल्यानंतर समाधानकारक पाऊस झाला नाही. अपेक्षित उत्पादन घेता यावे म्हणून शेतकर्यांनी महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली. आठवड्यापूर्वी शेतातील सोयाबीन शेंगाचे निरीक्षण केले असता, शेंगा धरल्या नसल्याचे दिसून आले. यासंदर्भात पंचायत समितीच्या कृषी अधिकार्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यानुसार सुटीच्या दिवशी पाहणी केली असता, सदर शेतात सोयाबीनला शेंगाच नसल्याचे निदर्शनास आले. मागील तीन वर्षाच्या सरासरीनुसार सोयाबीनचा प्रती एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन अपेक्षित असते. यावर्षी अनेक ठिकाणी शेंगाच धरल्या नसल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. सोयाबीनला शेंगा का लागल्या नाहीत, यासंदर्भात कृषी विभागाने संशोधन करावे तसेच नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याची मागणी शेतकर्यांनी सोमवारी केली.
रिसोड: तालुक्यातील मोप गावासह अन्य गावांतील सोयाबीन, तूर व अन्य पिकांची स्थिती नाजूक असून, प्रशासनाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी मोप येथील शेतकर्यांनी रिसोड तहसीलदारांकडे सोमवारी केली.
मोप परिसरातील गावांमध्ये मृग नक्षत्रात विलंबाने पावसाचे आगमन झाले. दरवर्षीपेक्षा यावर्षी २0 दिवस उशिराने पेरणी झाली. परिसरात अल्प प्रमाणात व तेही अनियमित पाऊस पडला. सोयाबीन पिकाला शेंगा, फुले धरण्याच्या काळात पावसाने दडी मारली. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची भीती शेतकर्यांनी वर्तविली. कर्ज काढून बी-बियाणे, खते, तणनाशक, फवारणी आदींचा खर्च केला आणि आता उत्पादनात घट येण्याच्या भीतीने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. शासनाने याबाबत तत्काळ दखल घेऊन विमा व इतर अनुदानाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी विठ्ठल कोकाटे, भिकाजी नागरे, डॉ. श्रीराम गरकळ, रामभाऊ नरवाडे, डॉ. रामेश्वर नरवाडे, संतोष घायाळ, सरपंच केशरबाई नरवाडे, अशोक नरवाडे यांच्यासह शेतकर्यांनी केली.
मानोरा: इंझोरी जिल्हा परिषद सर्कलमधील शेतकर्यांच्या शेतामधील पिके पाण्याअभावी तसेच अळ्यामुळे नष्ट होत आहेत. सर्कलमधील गावाची पीक पाहणी करून शेतकर्यांना न्याय द्यावा, पाहणी सात दिवसात न केल्यास रस्ता रोको आंदोलन करू, असा इशारा जि.प. सदस्य अनिता राऊत यांनी मानोरा तहसीलदारांना निवेदनाद्वारे ४ सप्टेंबरला दिला.
इंझोरी सर्कलमधील भोयणी, म्हसणी, तोरणाळा, जामदरा, उंबर्डा व इंझोरी गावात गेल्या एक महिन्यापासून पाऊस पडला नाही. पिकांवर किडीच्या प्रादुर्भावमुळे पिके नष्ट होत आहेत. महसूल प्रशासनाच्यावतीने तत्काळ इंझोरी सर्कलमधील पिकांची पाहणी करून शेतकर्यांना दिलासा देण्यात यावा आपल्या स्तरावरून सात दिवसांच्या आत पिकांची पाहणी करण्यात न आल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. निवेदनावर जि.प. सदस्य अनिता संतोष राऊत, पं.स. सदस्य मधुसूदन राठोड, गजानन भवाने, संतोष राऊत, रमेश पवार, गोपीचंद राठोड, सरपंच प्रकाश आडे, साहेबराव राठोड, काशीराम राठोड, नामदेव आडे, दत्ता राऊत, संजय राऊत, काशीराम गावंडे, लिलाबाई राऊत आदींच्या स्वाक्षरी आहेत.