वयाच्या ७८ व्या वर्षीही सायकलनेच मैलांचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 04:12 PM2020-02-02T16:12:43+5:302020-02-02T16:13:30+5:30
मैलांचा प्रवास सायकलनेच करण्याचा दिनक्रम शेलुबाजारनजिकच्या नागी येथील सेवानिवृत्त शिक्षक बापुराव राऊत गुरुजी पार पाडत आहेत.
- साहेबराव राठोड
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार: निम्मे आयुष्य ज्ञानदान करून विद्यार्थी घडविण्यात घातले. आता जिवनाच्या अखेरच्या टप्प्यावर वयाच्या ७८ व्या वर्षी कुठल्याही कामासाठी वाहनाचा आधार न घेता अनेक मैलांचा प्रवास सायकलनेच करण्याचा दिनक्रम शेलुबाजारनजिकच्या नागी येथील सेवानिवृत्त शिक्षक बापुराव राऊत गुरुजी पार पाडत आहेत. त्यांचा हा प्रवास गुटखा खान्यासाठी दुचाकीचा वापर करणाऱ्या युवकांना लाजवेल, असाच आहे.
शेलूबाजारपासून अवघ्या दिड किलोमीटर अंतरावर असलेले नागी हे बापुराव राऊत गुरुजीचे मूळ गाव आहे; जन्मभूमी जरी नागी गाव असले, तरी त्यांची कर्मभूमी मात्र शेलूबाजारच्या पंचक्रोशीतली दहा-बारा गावे. शिक्षण पूर्ण केल्यावर १९६५ मध्ये राऊत गुरुजी शेलूबाजारमधील लक्ष्मीचंद हायस्कूल वर शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यांच्यासोबत त्याच दिवसापासून त्यांचा 'सायकल'प्रवास सुरू झाला. आज अनेक उन्हाळे, पावसाळे आले अन गेले. राऊत गुरूजींचा सायकलचा प्रवास मात्र, थांबला नाही. ते शिक्षक म्हणून कार्यरत असताना नागीवरून शेलूला यायला कच्चा रस्ता होता. काट्या-कुपाट्यांचा रस्ता तुडवित गुरूजींनी तब्बल ३४ वर्षांत विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडविल्या. गुरूजींनी शिकवलेला इतिहास विषय तर वर्गात साक्षात इतिहासातील 'तो' प्रसंगच उभा करून जायचा. तर त्यांच्या भूगोलाचा तास म्हणजे जगाची अप्रत्यक्ष भ्रमंतीच घडवून आणायचा. लोकशाहीची बीजे त्यांच्या नागरिकशास्त्राच्या तासाने अनेक विद्यार्थ्यांच्या मनात रूजवलीत. आज राजकारणात काम करणाºया अनेक विद्यार्थ्यांमध्ये या क्षेत्राची ओढ गुरूजींच्या शिकवण्यातूनच निर्माण झाल्याचे ते विद्यार्थी विनम्रपणे मान्य करतात. या सेवा काळात त्यांनी फक्त वर्गात शिकवणारा शिक्षक एवढ्याच प्रतिमेत स्वत:ला बंदिस्त केलं नाही. पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये सायकलवरून पायपीट करीत शिक्षणाचे महत्व समजून सांगितले. शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेलेल्याना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. ज्या काळात स्वत:चा पगार फक्त ८० रुपये होता, त्याकाळात स्वत:च्या अन कुटूंबाच्या पोटाला चिमटा देत अनेक गरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत केली. आज गुरूजींनी शिकवलेली अनेक मुले समाजातल्या प्रत्येक क्षेत्रात आहेत.
दररोज ८ ते १० किलोमीटर सायकल
१९९९ मध्ये राऊत गुरूजी शिक्षकी पेशातून निवृत्त झालेत. मात्र, या औपचारिक निवृत्तीला त्यांनी कधीच स्वत:ला स्पर्शू दिले नाही. त्यानंतरही त्यांनी आपल्या सायकलच्या साथीने आपला शिक्षण जनजागृतीचा 'यज्ञ' कायम धगधगता ठेवला आहे. प्रवासाची साधने अलिकडे पार बदलून गेलीत. मात्र, गुरूजींच्या सायकलच्या सवारीची 'शान' आजही तशीच आहे. वयाच्या ७८ व्या वर्षीही ते दररोज ८ ते १० किलोमीटर सायकल चालवतात. याच सायकलने त्यांना आजवर तंदुरूस्त ठेवले आहे. ना कोणता आजार, ना कोणते दुखणे.