अवघ्या ४५ दिवसांच्या शेळीच्या पिलाने दिले दूध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:29 AM2021-05-31T04:29:32+5:302021-05-31T04:29:32+5:30
राजुरा येथील भगवान रवणे यांचा शेळीपालनाचा व राखणदारीचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. ते गेल्या ४० वर्षांपासून हे काम करत आहेत. ...
राजुरा येथील भगवान रवणे यांचा शेळीपालनाचा व राखणदारीचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. ते गेल्या ४० वर्षांपासून हे काम करत आहेत. त्यांच्याकडे स्वतःच्या जवळपास २० शेळ्या असून गावातील इतरही पशुपालकांच्या शेळ्या त्यांनी चारण्याकरिता ठरावीक मानधनावर घेतलेल्या आहेत.
दरम्यान, त्यांच्या स्वमालकीच्या मादी प्रजातीच्या शेळीने गत ४५ दिवसांपूर्वी दोन पिल्लांना जन्म दिला. त्यामध्ये एक नर (बोकड), तर एका मादीचा (शेळीचा) समावेश आहे. प्रारंभी पिले छोटे असल्याने रवणे यांनी महिनाभर त्यांचे घरीच संगोपन केले. त्यानंतर पिल्लांना इतर शेळ्यांसमवेत चराईसाठी सोडण्यात आले. एकेदिवशी त्यातील मादी पिलाचे स्तनाग्र पिळून पाहिले असता, त्यातून चक्क दूध निघाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही चर्चा गाव परिसरात वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी याबाबत कुतूहल व्यक्त केले.
................
कोट :
शेळीपालनाच्या ४० वर्षांच्या कालावधीत प्रथमच ४५ दिवसांचे पिलू दूध देत असल्याचा प्रकार पाहून मी प्रथम अचंबित झालो. काही दिवसांपूर्वी पिलाचे दूध काढून बघितले असता जवळपास छोटा ग्लासभर दूध पिलाने दिले.
- भगवान रवणे
शेळी पालनकर्ते, राजुरा
................
कोट :
जन्माच्या साधारणत: सहा महिन्यांनंतर शेळीची मादी प्रजात प्रजननासाठी सक्षम ठरून दूध देते; मात्र दीड महिन्याचे पिलू दूध देण्याचा प्रकार आगळावेगळा असून पिलाच्या शरीरात झालेल्या हार्मोन्सच्या बदलामुळे हा प्रकार घडत असावा.
- डॉ. आर. एस. बोरकर
पशुधन पर्यवेक्षक, राजुरा