शासकीय दूध शितकरण बंदमुळे दुधाची नासाडी! मातीमोल भावात विक्री, दूध शिल्लक राहत असल्याने नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 04:02 PM2017-10-26T16:02:34+5:302017-10-26T16:02:54+5:30
गेल्या ३० वर्षांपासून वाशिम येथे कार्यरत शासकीय दूध शितकरण केंद्र आठ ते दहा महिन्यांपासून बंद असल्याने दुध उत्पादक संस्था व पशुपालकांच्या मोठया प्रमाणात दुधाची नासाडी होत आहे.
शिरपूर- गेल्या ३० वर्षांपासून वाशिम येथे कार्यरत शासकीय दूध शितकरण केंद्र आठ ते दहा महिन्यांपासून बंद असल्याने दुध उत्पादक संस्था व पशुपालकांच्या मोठया प्रमाणात दुधाची नासाडी होत आहे. दुध घेण्यासाठी कोणीच तयार नसल्याने दुधाची काय करावे असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. २६ ऑक्टोंबर रोजी शिरपूर येथे दुध विक्रीसाठी घेवून जाणाऱ्यांना रिकाम्या हातांनी परतावं लागलं. जिल्हाप्रशासनाने याकडे लक्ष देवून शासकीय दूध शितकरण केंद्र सुरु करण्याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी पशुपालकांच्यावतीने होत आहे.
वाशिम येथील शितकरण दूध केंद्र बंद असल्याने पशुपालकांनी गावातील दूध डेअरींवर आपल्याकडील दूध विकणे सुरु केले होते. परंतु दररोज येत असलेल्या मोठया प्रमाणातील दूध साठवण व थंड करणे शक्य होत नसल्याने खरेदीदारांनी दुध न घेण्याचे सांगितले.
यामुळे पशुपालक दूध नागरिकांच्या घरोघरी, हॉटेल्स, रेस्टॉरंटवर कमी जास्त भावात विकत आहेत. त्यानंतरही दूध शिल्लक राहत असल्याने मात्र त्यांचे नुकसान होत आहे. शासकीय दूध शीतकरण केंद्राकडे शासनाच्या दुग्धव्यवसाय विकास विभागाने सपशेल पाठ फिरवली असून दूधाचा पुरवठाच होत नसल्याने हे केंद्र गेल्या ८ ते १० महिन्यांपासून बंद पडले आहे. परिणामी, केंद्रातील लाखो रुपयांचे यंत्र व इतर मालमत्ता धूळ खात पडून असल्याचे दिसून येत असल्याचे केंद्रातर्फे सांगण्यात येते तर दुध उत्पादक संस्था शितकरण बंद असल्याचे कारण पुढेकरीत नुकसान होत असल्याचे सांगत आहे.
नेमकं काय घडलं ?
- गतवर्षीपासून शीतकरण केंद्राला होणारा दुधाचा पुरवठा अचानक कमी झाल्याने व्यवस्थापनावर होणारा खर्च परवडेनासा झाल्याने साधारणत: १० महिन्यांपासून हे दूध शीतकरण केंद्र बंद करण्यात आले आहे.
- दुध संकलन केंद्रातकार्यरत व्यवस्थापक, दुधसंकलन पर्यवेक्षक, दुध परिचर आदी पदांवरील कर्मचाऱ्यांना अकोला येथील दुध संकलन केंद्राकडे वर्ग करण्यात आले आहे.
- दुध संकलन केंद्रात जाणारे दूधही संकलन केंद्र बंद झाल्याने डेअरीवर विक्रीस येवू लागले. यामुळे डेअरीवाल्यांकडे दुध साठवण क्षमता पुरेसी नसल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत. यापुढे दूध न आणण्याच्या सूचना दिल्याने दूधाची नासाडी होत आहे.