कारंजात अज्ञाताने जाळला लाखोंचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:57 AM2021-02-25T04:57:09+5:302021-02-25T04:57:09+5:30
गुटखा पुड्या खाऊन ठिकठिकाणी थुंकण्याच्या प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गुटखा विक्रीवरच नियंत्रण मिळविण्याकरिता स्थानिक तहसीलदारांनी पुढाकार घेतला आहे. ...
गुटखा पुड्या खाऊन ठिकठिकाणी थुंकण्याच्या प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गुटखा विक्रीवरच नियंत्रण मिळविण्याकरिता स्थानिक तहसीलदारांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने औषध प्रशासन व शहर पोलिसांना अवैध गुटखा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २१ फेब्रुवारी रोजी कारंजा शहरातील मेमनपुरा परिसरात ३४ लाखांचा व २३ फेब्रुवारी रोजी शहरातील माळीपुरा भागात ११ लाखांच्या गुटखा पुड्यांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यापूर्वीही कारंजा शहरात अनेकदा गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
तथापि, अवैध गुटखा विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचे धाडसत्र सातत्याने सुरू असल्याने यातील व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. अवैध कारवाई टाळण्याच्या उद्देशाने कान्हव जीन परिसरात गुटखा जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जाळण्यात आलेल्या गुटख्याची किंमत लाखोंच्या घरात असल्याचे दिसून येत आहे.