नंबर प्लेटचा रंग बदलवून केली जातेय लाखोंची कर चोरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 03:56 PM2019-05-05T15:56:07+5:302019-05-05T15:56:27+5:30
परमिट असलेल्या वाहनांवरील पिवळ्या रंगाची नंबरप्लेट बदलवून त्याजागी पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट लावून परिवहन अधिकारी व वाहतुक पोलीसांच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे.
धनंजय कपाले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मुंबई, पुणे, नागपूर, हैद्राबाद यासारख्या बड्या शहरांमधून टुरिस्ट परवाना असलेली वाहने (परमिट) अल्प दरात खरेदी करण्याचा ओघ अलीकडच्या काळात चांगलाच वाढला आहे. परमिट असलेल्या वाहनांवरील पिवळ्या रंगाची नंबरप्लेट बदलवून त्याजागी पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट लावून परिवहन अधिकारी व वाहतुक पोलीसांच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे. यामाध्यमातून शासनाचा लाखो रूपयांचा कर चोरी करण्याची नविन शक्कल वाहनधारकांनी शोधून काढल्याचे दिसून येत आहे.
टुरिस्ट परवान्याची मुदत ही पाच वर्षांची असते, त्यानंतर परवाना नुतनीकरण करावा लागतो. असे असताना मोठ्या शहरामध्ये टुरीस्ट परवान्याची वाहने चार ते पाच वर्षापर्यंत वापरली जातात. त्यानंतर ही वाहने एजंटांमार्फत छोट्या शहरातील ग्राहकांना विकली जातात. टुरिस्ट परवानाधारक व्यक्तीस अथवा कंपनीस व्यवसाय कर भरणे आवश्यक असते. व्यवसायकराची वसुली आरटीओ कार्यालयात केली जाते. खासगी कारचा कर व टुरिस्ट कारचा कर यामध्ये एक महत्त्वाचा फरक असतो, तो म्हणजे टुरिस्ट कारचा कर वार्षिक किंवा त्रैमासिक पद्धतीने भरणा करावा लागतो, तर खासगी कारचा कर एकरकमी भरावा लागतो. टुरिस्ट कारसाठी दरवर्षी योग्यता प्रमाणपत्र, विमा, अधिकार नुतनीकरण करून घेणे गरजेचे असते. फिटनेस प्रमाणपत्र जर वेळेवर नुतनीकरण केले नाही, तर कमीत किमान हजार आणि प्रति उशिराच्या दिवसासाठी एक दिवस निलंबन किंवा शंभर रुपये प्रतिदिवस तडजोड शुल्क भरावा लागतो. हे टाळण्यासाठी नंबर प्लेटचा रंगच बदलवून टाकला जात आहे.
वैयक्तिक वापरासाठी असलेल्या वाहनांवर पांढºया रंगाची नंबर प्लेट लावण्यात येते. तसेच प्रवासी वाहतुक करण्यासाठी असलेल्या वाहनांवर पिवळ्या रंगाची नंबर प्लेट, विदेशी प्रतिनिधींसाठी असलेल्या वाहनांवर निळ्या, व्यावसायिक कामांसाठी वापरल्या जाणाºया वाहनांवर काळ्या, राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या वाहनांवर लाल, सैन्यदलाच्या वाहनांवर अॅरो असलेली नंबर प्लेट; तर बॅटरीवर चालणाºया वाहनांवर हिरव्या रंगाची नंबरप्लेट लावलेली असणे नियमानुसार बंधनकारक आहे.