प्रवासी वाहतुकीतून लाखोंची उलाढाल
By Admin | Published: November 20, 2015 02:11 AM2015-11-20T02:11:46+5:302015-11-20T02:11:46+5:30
खासगी वाहनांच्या प्रवास भाड्यात भरघोस वाढ ; वाशिम जिल्हय़ात महामंडळाच्या ७५ अतिरिक्त बसफे-या.
वाशिम: दिवाळीदरम्यानच्या प्रवासी वाहतुकीने जिल्हय़ात लाखो रुपयांची उलाढाल होत असून, खासगी प्रवासी वाहतुकीच्या मनमानी प्रवास भाड्याचा भुर्दंड प्रवाशांच्या खिशाला बसत आहे. जिल्हय़ातील चारही आगारांना ८ ते १८ नोव्हेंबरदरम्यान २९ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. दिवाळीचा उत्साह ओसरून आठ दिवस लोटत आहेत; मात्र अजूनही एसटी महामंडळाच्या बसेस तसेच खासगी ट्रॅव्हल्समधील गर्दी फारसी ओसरली नसल्याचे दिसून येते. जिल्हय़ातील सर्व आगारांमध्ये प्रवाशांची गर्दी असून दिवाळीदरम्यान प्रवासातूनही लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे. प्रवाशांची गर्दी कॅश करण्यासाठी महामंडळाने ८ ते २५ नोव्हेंबरपर्यंत प्रवासी भाड्यात १0 टक्क्यांची वाढ केली. या वाढीमुळे ग तवर्षीपेक्षा यावर्षी जिल्हय़ातील चारही आगारांना जास्त उत्पन्न मिळत असल्याचे दिसून येते. वाशिम आगाराला १0 लाख, रिसोड आगाराला ५ लाख, मंगरुळपीर आगार सहा तर कारंजा आगाराला ८ लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न अतिरिक्त बसेसने मिळवून दिले आहे. शाळेला सुट्या लागल्या की दिवाळी साजरी करण्यासाठी एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी येणार्या-जाणार्या प्रवाशांची चिक्कार गर्दी होत अस ते, हा दरवर्षीचा अनुभव आहे. चिक्कार गर्दीमुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही तसेच सदर गर्दी व्यावसायिक दृष्टिकोनातून कॅश करण्यासाठी एसटी महामंडळाने अतिरिक्त बसेसचे नियोजन केले आहे. वाशिम आगाराने ३२, रिसोड आगाराने २८, मंगरुळपीर आगार नऊ आणि कारंजा आगाराने सहा अशा एकूण ७५ अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या आहेत. दिवाळीदरम्यान प्रवाशांची चिक्कार गर्दी झाली होती. दिवाळी संपूनही गर्दी कमी होत नसल्याची आताची परिस्थिती आहे. जिल्हय़ातील प्रत्येक बसस्थानकात बस आल्यानंतर प्रवासी त्या बसला गराडा घालत असल्याचे चित्र आहे. जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू असल्याचे दिसून येते. रिसोड बसस्थानकामध्ये आताही प्रवाशांची गर्दी असल्याचे दिसून येते. दिवाळीदरम्यानच्या २८ जादा बसेसने रिसोड आगाराला ४ लाख ९३ हजार ५४0 रुपयांचे उत्पन्न १८ नोव्हेंबरपर्यंंत मिळवून दिले आहे. अजून कॉन्व्हेंट व शाळेला सुट्या असल्याने बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून येते. मंगरुळपीर आगाराने नऊ बसेस जादा सोडल्या आहेत. एकूण ६ लाखांचे उत्पन्न मिळाले असून, दिवाळी व जादा बसेसने साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळवून दिले आहे.