म्युकरमायकोसिसवरील किमान खर्च आठ लाख; शासनाची मदत केवळ दीड लाखाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:36 AM2021-05-22T04:36:51+5:302021-05-22T04:36:51+5:30
कोरोनातून मुक्त झालेल्या काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ नामक नव्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात या आजाराचे आतापर्यंत १२ रुग्ण ...
कोरोनातून मुक्त झालेल्या काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ नामक नव्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात या आजाराचे आतापर्यंत १२ रुग्ण आढळले असून, रिसोड तालुक्यातील एका ६२ वर्षीय महिलेचा काही दिवसांपूर्वी उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.
दरम्यान, खासगी रुग्णालयातील उपचारांचा खर्च जनआरोग्य योजनेतील लाभार्थ्यांना देण्याकरिता या योजनेत समाविष्ट खासगी रुग्णालयांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून दीड लाखाचे दहा दिवसांचे ‘पॅकेज’ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. असे असले तरी शस्त्रक्रिया, महागडी औषधी व इंजेक्शन्स यासह इतर उपचारांत्मक बाबींवर एका रुग्णाला ८ ते १० लाख रुपये खर्च येत असताना दीड लाखात हा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न खासगी रुग्णालयांना पडला आहे.
.....................
रुग्ण व त्यांचे नातेवाईक हतबल
म्युकरमायकोसिस आजार जडणाऱ्या रुग्णांना मायक्रोबायोलॉजिस्ट, इंटरनल मेडिसीन स्पेशालिस्ट, न्युरोलॉजिस्ट, ईएनटी स्पेशालिस्ट, ऑप्थेल्मोलॉजिस्ट, डेंटिस्ट, मॅक्सिलोफेशिअल किंवा प्लास्टिक सर्जन व बायोकेमिस्ट, आदी विशेषज्ञांच्या सेवांची गरज भासते.
‘लिपोसोमल अॅम्फोटीसिरीन-बी’ ‘५० एमजी’च्या एका इंजेक्शनची किंमत बाजारात ७ हजार ५०० रुपये आहे. रुग्णाच्या आजाराची गंभीरता पाहून दिवसाला जवळपास दोन ते चार इंजेक्शन देण्याची गरज पडू शकते.
‘पॉसॅकोनाझोल’ नामक दहा गोळ्यांची किंमत पाच हजारांच्या आसपास आहे. याशिवाय, इतरही औषधांचा खर्च मोठ्या प्रमाणात आहे. तो दीड लाखात बसत नसल्याचे योजनेतील काही रुग्णालयांचे म्हणणे आहे. सध्यातरी एकाही खासगी रुग्णालयात या योजनेतून उपचार होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
....................
रुग्णांच्या नातेवाइकांची पैशांसाठी धावाधाव
गत वर्षभरापासून कोरोना संसर्ग जिल्ह्यात ठाण मांडून आहे. त्यातच आता म्युकरमायकोसिस आजाराचे प्रस्थ हळूहळू वाढायला लागल्याने आजार जडणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी आहे, ते नागपूर, मुंबई, औरंगाबाद यांसारख्या महानगरांमध्ये रुग्णाला घेऊन जात आहेत; मात्र गोरगरीब रुग्णांच्या नातेवाइकांना पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव करावी लागत असल्याचे एका रुग्णाच्या नातेवाइकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
................
- म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यातील रुग्ण : १२
- म्युकरमायकोसिसचे एकूण मृत्यू : ०१