गौण खनिज उत्खनन प्रशासनाच्या ‘रडार’वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:31 AM2017-11-01T01:31:04+5:302017-11-01T01:32:09+5:30
वाशिम: प्रशासनाला अंधारात ठेवून निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक गौण खनिज उत्खनन करणारे महसूल प्रशासनाच्या रडारवर आहेत. त्यासाठी कठोर पावले उचलण्यात येत असून, जिल्ह्यात असे प्रकार शोधून काढण्यासाठी प्रादेशिक खनिकर्म विभागामार्फत पाहणी करण्याचा प्रस्ताव खनिकर्म अधिकार्यांकडून पाठविण्यात आला असल्याची माहिती मंगळवारी प्राप्त झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: प्रशासनाला अंधारात ठेवून निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक गौण खनिज उत्खनन करणारे महसूल प्रशासनाच्या रडारवर आहेत. त्यासाठी कठोर पावले उचलण्यात येत असून, जिल्ह्यात असे प्रकार शोधून काढण्यासाठी प्रादेशिक खनिकर्म विभागामार्फत पाहणी करण्याचा प्रस्ताव खनिकर्म अधिकार्यांकडून पाठविण्यात आला असल्याची माहिती मंगळवारी प्राप्त झाली.
जिल्ह्यातील अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन करणार्या लोकांविरुद्ध शासन कडक कारवाई करणार आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील अधिकृत खदानींसह इतर ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने गौण खनिजाचे उत्खनन होत आहे काय, याची तपासणी करण्यासाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाकडून प्रादेशिक पथकांमार्फत तपासणी करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात जवळपास ५0 च्यावर गौण खनिजाच्या खदानी आहेत. या सर्व खदानींची पाहणी वर्ष दोन वर्षांनी खनिकर्म अधिकार्यांकडून करण्यात येते. ही कारवाई जिल्हा स्तरावरील पथकांकडून करण्यात येते. आता प्रादेशिक पथकाद्वारे ही पाहणी करण्याचा प्रस्ताव खनीकर्म अधिकार्यांकडून पाठविण्यात आला आहे. प्रादेशिक पथकाकडून करण्यात आलेल्या पाहणीत र्मयादेपेक्षा किंवा निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक उत्खनन झाल्याचे आढळल्यास, तसेच अनधिकृत ठिकाणी गौण खनिज उत्खनन झाल्याचे दिसल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. नियमानुसार किमान ५ वर्षांच्या कालावधीसाठी गौण खनिज उत्खननासाठी खदानी लीजवर देण्यात येतात. या खदानीतून गौण खनिजाचे उत्खनन करण्यापूर्वी जिल्हा खनिकर्म विभागात रक्कम भरुन रॉयल्टीच्या पासेस घ्याव्या लागतात. त्यानंतरच गौण खनिज खदानीतून काढून ग्राहकांना दिल्या जाते. ज्या वाहनांमधून गौण खनिजांची वाहतूक केल्या जाते, त्या वाहनधारकांकडेही सदर पास असणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे अशी पास नसल्यास गौण खनिजाचे अवैध वाहतूक करण्याप्रकरणी १0 हजारांचा दंड आकारण्यात येतो, साधारणपणे प्रत्येक वाहनामागे ५0 हजारांएवढा दंड आकारण्यात येतो. आता जिल्ह्यातील खदानीचे प्रादेशिक पथकाकडून मोजमाप करण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाकडूनच प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याने. जिल्ह्यात नियमबाह्य पद्धतीने किंवा निर्धारित क्षेत्रापेक्षा अधिक गौण खनिजाचे उत्खनन करणार्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे दिसत आहे. या अनुषंगाने महसूल बुडविणार्या खदानधारकांवरही कारवाई होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आता असे प्रकार करणारे नमके किती हे कारवाईनंतरच स्पष्ट होईल.
प्रादेशिक पथकांकडे ‘कंट्रोल मॅपिंग’
गौण खनिजाचे उत्खनन किती करण्यात आले हे माहिती झाल्याशिवाय कार्यवाही केली जाऊ शकत नाही. हे माहीत करण्यासाठी प्रादेशिक पथकांकडे पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ आणि अद्ययावत यंत्रणा, तसेच साहित्याची उपलब्धता असते. त्यामुळे कोणत्या खदानीतून किती गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आले, ते निश्चित कळू शकते आणि त्यामध्ये नियमबाह्य पद्धतीने किंवा प्रमाणापेक्षा अधिक गौण खनिजाचे उत्खनन झाल्यास अधिक उत्खननापोटी किती आकारायचा, दंड आकारायचा की खदानीची मान्यता रद्द करायची, ते ठरविले जाते.
जिल्ह्यातील गौण खनिजांच्या खदानींची तपासणी आणि मोजमाप प्रादेशिक पथकामार्फत करण्यासाठी आम्ही वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविलेला आहे. तथापि, वरिष्ठ स्तरावरून अद्याप तपासणीचा कार्यक्रम निश्चित झालेला नाही तरी, ही तपासणी मात्र होणार आहे.
- डॉ. विनय राठोड
खनिकर्म अधिकारी, वाशिम
-