चुलत भाचीसोबत कुकर्म; नराधमास २० वर्षे कारावास, मंगरूळपीर न्यायालयाचा आदेश
By सुनील काकडे | Published: April 27, 2024 07:04 PM2024-04-27T19:04:20+5:302024-04-27T19:04:47+5:30
मंगरूळपीर न्यायालयाचा आदेश; ४ वर्षानंतर पीडितेला न्याय
वाशिम : मानोरा तालुक्यातील एका गावात डिसेंबर २०२० मध्ये १४ वर्षे वय असलेल्या चुलत भाचीसोबत कुकर्म करणाऱ्या नराधमास मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने २५ एप्रिल रोजी २० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. यामुळे ४ वर्षानंतर का होईना पिडीत मुलीला न्याय मिळाला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीच्या आईचा चुलत भाऊ याचे घरी येणे जाणे होते. यादरम्यान ८ नोव्हेंबर २०२० रोजी घरी मुलगी एकटीच असल्याची संधी साधून त्याने तिच्यावर कुकर्म केले. याप्रकरणी पीडितेच्या आईने मानोरा पोलिसांत ९ नोव्हेंबर २०२० रोजी तक्रार दाखल केली.
त्यावरून आरोपीविरूद्ध भादंविचे कलम ३७६, ४५२, ४५०, सहकलम ३, ४, पोक्सो अन्वये गुन्हा दाखल झाला. दरम्यान, घटनेतील आरोपीस पोलिसांनी अटक करून मार्च २०२० मध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट केले. सरकार पक्षातर्फे साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेण्यात आली. पिडीत मुलगी, तिची आई आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष त्यात महत्वाची ठरली. दरम्यान, सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस २० वर्षे सश्रम करावास व १० हजार रुपये दंड. दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच सहकलम ४५० आयपीसी नुसार ४ वर्षे कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा देखील सुनावण्यात आली. दंडाची एकूण ११ हजार रुपये रक्कम पिडीतेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता पी.एस. ढोबळे यांनी काम पाहिले.