चिखली-व्याड रस्त्याची दैना; वाहनचालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:41 AM2021-04-24T04:41:46+5:302021-04-24T04:41:46+5:30
वाशिम : रिसोड तालुक्यातील चिखली-व्याड या रस्त्याची चाळण झाली असल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी जिल्हा ...
वाशिम : रिसोड तालुक्यातील चिखली-व्याड या रस्त्याची चाळण झाली असल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे गुरुवारी केली.
चिखली-व्याड हा चार किमी अंतराचा रस्ता मराठवाड्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असून, गत चार वर्षांपासून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पंचायत समिती गणाचे गाव असलेल्या व्याड येथे चिखली मार्गे जाण्यासाठी खड्डामय रस्ता असल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने समोरच्या वाहनाला बाजू देताना चालकांची दमछाक होत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी वारंवार करण्यात आली; परंतु अद्याप खड्डे बुजविण्यात आले नाहीत. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्यांमुळेदेखील वाहनचालकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी रस्ता दुरुस्ती करावी, तसेच झाडाच्या फांद्या तोडण्यात याव्या, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक, पंचायत समिती सदस्य रवीचंद्र बोंडे, सरपंच सुनीता थोरात, उपसरपंच रामभाऊ बोरकर, ग्रा.पं. सदस्य शकुंतला चौधरी, नंदा डाखोरे, यमुना वाळले, भागवत थोरात, शेख जावेद शेख रहीम आदींनी कार्यकारी अभियंत्यांकडे केली. रस्ता दुरुस्ती न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. निवेदनावर सीताराम वाळले, सुनील वाळले, संजय चौधरी, इकबाल देशमुख, इरफान देशमुख, विष्णू पवार यांच्यासह ११० नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.
००००
कोट
वाहनचालकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व्याड-चिखली या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जाईल.
- सुनील कळमकर
कार्यकारी अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम.