अकरावीचे ‘मिशन-अॅडमिशन’; शाळास्तरावरच मिळणार प्रवेश!शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहिर
By संतोष वानखडे | Published: June 9, 2024 04:20 PM2024-06-09T16:20:53+5:302024-06-09T16:21:21+5:30
१२ व १३ जूनला प्रवेश अर्ज विक्री व स्विकृती...
वाशिम : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १० जूनला गूणपत्रिका मिळाल्यानंतर जिल्ह्यात १२ जूनपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेसंदर्भात वेळापत्रक जाहिर केले असून, शाळास्तरावरच ऑफलाईन पद्धतीने गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार आहेत.
जिल्ह्यात १८७ कनिष्ठ महाविद्यालय आहेत. या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जवळपास २१ हजार ८०० प्रवेशित जागा आहेत. यंदा दहावीच्या परीक्षेत १८ हजार ९९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्रवेशित जागा अधिक असल्याने विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत प्रवेश मिळणार आहे. अमरावती शिक्षण मंडळाकडून दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १० जून रोजी गुणपत्रिका मिळणार आहे. त्यानंतर १२ जूनपासून ‘मिशन-अॅडमिशन’ सुरू होणार आहे. जिल्ह्यात यावर्षीदेखील शाळास्तरावरच गुणवत्तेच्या आधारावर ऑफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अनुदानित तुकड्यावरील विद्यार्थी प्रवेश क्षमता पूर्ण झाल्यानंतर क्रमाक्रमाने विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तुकड्यांमध्ये प्रवेश क्षमता पूर्ण करावी लागणार आहेत. १२ व १३ जून रोजी विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातून प्रवेश अर्ज वितरीत केले जाणार असून, १३ जूनपर्यंत पूर्ण भरलेले अर्ज स्विकारले जाणार आहेत. १४ जून रोजी अर्जांची छाननी होणार असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
असे आहे वेळापत्रक
कालावधी / कार्यवाही
१२ ते १३ जून - प्रवेश अर्ज विक्री व स्विकृती
१४ जून : प्रवेश अर्जाची छाननी
१८ जून : गुणवत्ता यादी फलकावर लावणे
१८ ते २७ जून : प्रवेश यादीनुसार प्रवेश देणे
२८ जून : रिक्त जागेकरीता पहिली प्रतिक्षा यादी
२८ ते २९ जून : प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश
१ ते २ जुलै : दुसरी प्रतिक्षा यादी
३ ते ४ जुलै : दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील प्रवेश