‘मिशन अॅडमिशन’ : क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश घेणे येणार अंगलट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 03:50 PM2018-06-18T15:50:14+5:302018-06-18T15:50:14+5:30
वाशिम - इयत्ता दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अकरावीची प्रवेश संख्या जास्त असल्याने जिल्ह्यातील कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने विहित क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊ नये अन्यथा शासन निर्णयानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिला.
वाशिम - इयत्ता दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अकरावीची प्रवेश संख्या जास्त असल्याने जिल्ह्यातील कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने विहित क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊ नये अन्यथा शासन निर्णयानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिला.
अकरावीच्या प्रवेशासाठी जिल्ह्यात एकूण २१ हजार ८४० जागा उपलब्ध आहेत. यावर्षी इयत्ता दहावीचे एकूण १८ हजार ८५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रवेशीत जागांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थी संख्या कमी असल्याने मिशन अॅडमिशन सुलभ झाले आहे. कला, वाणिज्य, विज्ञान किंवा संयुक्त शाखांच्या प्रवेशसाठी शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील किमान गुणांची कोणतीही अट नाही. माध्यमिक शाळांना जोडलेल्या उच्च माध्यमिक वर्गाची प्रवेश क्षमता ८० व स्वतंत्र उच्च माध्यमिक वर्गाची प्रवेश क्षमता १०० आणि महाविद्यालयांना जोडलेल्या उच्च माध्यमिक वर्गाची प्रवेश क्षमता १२० अशी आहे. मान्य तुकड्यांमध्ये निश्चित केलेल्या क्षमतेपेक्षा जादा प्रवेश देण्यात येऊ नये, अशा सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी टी.ए. नरळे यांनी जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहेत. निर्धारीत प्रवेश क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास सदर प्रवेश पटपडताळणी व संचमान्यतेमध्ये मान्य केले जाणार नाहीत व त्यामुळे होणाºया परिणामाची जबाबदारी संबंधित प्राचार्य व मुख्याध्यापकांची राहिल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
मान्यता प्राप्त तुकडीमध्ये निश्चित केलेल्या प्रवेश क्षमतेपेक्षा प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या जादा असल्यास स्थानिक किंवा नजीकच्या परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयाची प्रवेश क्षमता पूर्ण झाल्याची खात्री करूनच जादा प्रवेशाची परवानगी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात यावी, अशा सूचनाही दिल्या. प्रवेश प्रक्रिया इयत्ता ११ वीची असल्यामुळे इयत्ता १२ वी करिता कोणीही परवानगीशिवाय अतिरिक्त प्रवेश घेऊ नये. बारावीमधील प्रवेशही निश्चित केलेल्या विहित क्षमतेमध्येच करण्यात यावे. विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रवेश देण्याची जबाबदारी संबंधित प्राचार्य व मुख्याध्यापकांची असल्याने कुणीही विद्यार्थी किंवा पालकांना शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्रवेशासाठी पाठवू नये. स्पष्ट अभिप्राय नोंदवूनच प्रवेशार्थींना अपवादात्मक परिस्थितीत पाठवावे, अशा सूचना दिल्या. प्रवेश देताना देणगी घेतल्यास संंबंधितांविरूद्ध महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम १९८७ नुसार कार्यवाही केली जाईल, असा इशारा देण्यात आला.