जीवघेण्या आजारांपासून बचावासाठी प्रभावी ठरणार ‘मिशन इंद्रधनुष्य’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 02:27 PM2019-12-01T14:27:46+5:302019-12-01T14:27:56+5:30
२ डिसेंबरपासून ‘मिशन इंद्रधनुष्य २.०’ ही विशेष मोहिम चार टप्प्यात राबविण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गर्भवती महिला व बालकांमधील जीवघेण्या आजारांवर नियंत्रण मिळवून माता-बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात २ डिसेंबरपासून ‘मिशन इंद्रधनुष्य २.०’ ही विशेष मोहिम चार टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यामाध्यमातून २३७ गरोदर महिला व १४६० बालकांचे लसीकरण करून त्यांना विविध आजारांपासून सुरक्षित केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी शनिवार, ३० नोव्हेंबरला दिली.
क्षयरोग, कावीळ, पोलीओ, गोवर, घटसर्प, डांग्या खोकला यासह अन्य आजारांसाठी लसीकरण केल्याने गरोदर माता व बालकांना सुरक्षितता येते. त्यानुषंगाने जिल्ह्यातील जोखीमग्रस्त भागातील शून्य ते दोन वर्षे वयोगटातील जी बालके आणि गरोदर माता सर्वेक्षणानुसार लसीकरणापासून वंचित आहेत, त्यांच्यासाठी ‘मिशन इंद्रधनुष्य २.०’ हे २ डिसेंबरपासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी मोडक यांनी सांगितले, की युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने २ डिसेंबर २०१९, ६ जानेवारी २०२०, ३ फेब्रुवारी २०२० आणि २ मार्च २०२० अशा चार टप्प्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोहिम राबविण्यात येईल. पहिल्या टप्प्यात, २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या १६२ आरोग्य सेवा सत्राव्दारे जोखीमग्रस्त भागातील सर्वेक्षणानुसार गरोदर महिला व बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील १६७ आणि शहरी भागातील ७० अशा एकूण २३७ गरोदर महिला आणि शून्य ते २ वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील ९०० आणि शहरी भागातील ५६० अशा एकूण १४६० बालकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगतले.