सुरूवातीच्या टप्प्यातच अडखळतेय ‘मिशन वात्सल्य’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:52 AM2021-09-16T04:52:08+5:302021-09-16T04:52:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोनामुळे आई-वडिलांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे कोरोनाने निधन होऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनामुळे आई-वडिलांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे कोरोनाने निधन होऊन एकल किंवा विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या १८ विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने २५ ऑगस्ट २०२१पासून ‘मिशन वात्सल्य’ हा उपक्रम हाती घेतला. मात्र, २१ दिवस होऊनही वाशिम जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमधील विशेषत: ग्रामीण भागात या मिशनची अंमलबजावणी शून्य असून, सुरूवातीच्या टप्प्यातच हे अभियान अडखळत असल्याचे दिसत आहे.
राज्यात साधारणत: मार्च २०२०पासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट उद्भवले. कोरोनामुळे १३ सप्टेंबरअखेर १ लाख ३८ हजार जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याने महिलांना अचानक वैधव्याला सामोरे जावे लागले. मार्च २०२०नंतर विधवा झालेल्या महिलांची एकूण संख्या १६ हजारांवर आहे. अशा महिलांना मदत करण्यासाठी तसेच त्यांना उपजीविकेसाठी विविध स्वरूपातील योजनांमध्ये सहभागी करून घेत अर्थसहाय्य मिळवून देण्याचा प्रयत्न ‘मिशन वात्सल्य’च्या माध्यमातून करण्यात यावा, असे शासनाचे निर्देश आहेत.
प्रत्यक्षात मात्र राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये अंमलबजावणी यंत्रणेतील बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांनाच अद्यापपर्यंत ‘मिशन वात्सल्य’ नेमके काय, हे कळलेले नाही. गेल्या २१ दिवसात अनेक ठिकाणी या अंतर्गत एकही सभा झालेली नाही. ग्रामीण भागात प्रभावी पद्धतीने आजही या अभियानासंबंधी कुठलीही जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यातच अशी स्थिती निर्माण झाल्याने ‘मिशन वात्सल्य’च्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
....................
बाॅक्स :
वाशिम जिल्ह्यात पात्र महिलांची नेमकी आकडेवारीच नाही
राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे वाशिम जिल्ह्यातही कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याने अनेक महिला विधवा झाल्या, त्यांचा जीवनसाथीच काळाने हिरावल्यामुळे त्यांचे भविष्य अंध:कारमय झाले. संबंधितांना ‘मिशन वात्सल्य’चा आधार मिळणार आहे; मात्र अशा महिला नेमक्या किती, याची नेमकी आकडेवारीच प्रशासनाकडे उपलब्ध नाही.
..............
कोट :
‘मिशन वात्सल्य’ जिल्ह्यात राबविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत वाशिम तालुकास्तरीय समितीची पहिली सभा गुरूवार, १६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यात अंमलबजावणी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे उद्बोधन केले जाणार असून, मिशनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल.
- प्रियंका गवळी, महिला व बालविकास अधिकारी, वाशिम