सावधान...मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांना जडतोय मानसिक आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 11:56 AM2020-12-28T11:56:01+5:302020-12-28T11:56:24+5:30
Beware of Mobile over use वेळीच सावध होऊन मोबाईलपासून मुलांना दूर ठेवावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क v
वाशिम : गत सात महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाइलचा वापर वाढल्याने मुलांमध्ये डोकेदुखीबरोबरच मानसिक आजारही बळावत असल्याचे समोर येत आहे. पालकांनी वेळीच सावध होऊन मोबाईलपासून मुलांना दूर ठेवावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.
कोरोनामुळे सर्वच क्षेत्र प्रभावित झाले असून, यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप, संगणकावरील स्क्रीन टाईम वाढला आहे. गत सात महिन्यांपासून मुलांची मोबाईलशी घट्ट मैत्री झाल्याने याचे दुष्परिणामही समोर येत आहेत. मोबाईल, संगणकावर सतत ऑनलाईन राहिल्यामुळे डोळे, मेंदुवर ताण पडतो.
त्यामुळे साहजिकच डोकेदुखीचा त्रास जाणवत असून चिडचिडही वाढत आहे. मेंदूवर जास्त ताण आल्यास अभ्यासात मन लागत नाही, अतिवापरामुळे मुलांना मोबाईलचे व्यसन जडत असल्याने मानसिक आजार बळावत असल्याचे मेंदु व मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
हे आहेत दुष्परिणाम
मुलांमध्ये मोबाईल बघण्याचे प्रमाण वाढल्याने स्थूलपणा, पचनसंस्थेचे आजार, चिडचिडेपणा, नैराश्य, अस्वस्थपणा, निरूत्साह वाढीस लागला. एकलकोंडेपणा, इतरांना मारणे, वस्तू फेकणे किंवा तोडणे, अतिचंचलता, जिद्दी व हट्टीपणा वाढला आहे. आदी लक्षणे असणाऱ्या मुलांना बालरोग, मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.
मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये एकाग्रता राहत नसून, एकलकोंडेपणा वाढीस लागत आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणकावरील स्क्रीन टाईम वाढल्याने नैराश्य, मानसिक आजार जडत आहेत.
- डॉ. नरेश इंगळे
मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम
मोबाईलपासून मुलांना शक्यतोवर दूरच ठेवणे गरजेचे आहे. अलिकडच्या काळात मुले मोबाईलच्या आहारी जात असल्याने नैराश्य, चिडचिड वाढत आहे. पालकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
- डॉ. राम बाजड, बालरोग तज्ज्ञ, वाशिम