मोबाईल, टी.व्ही.च्या अतिरेकाने भावी पिढी संकटात - डॉ. हरीष बाहेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 07:05 PM2019-10-19T19:05:01+5:302019-10-19T19:05:09+5:30
सातत्याने टी.व्ही.समोरच लागून असतात, त्यांना वेळकाळच काय; पण भुकेचेही भान राहत नाही, अशी पालकांचीच तक्रार राहते.
वाशिम: गत काही वर्षांत लहान मुलांमध्ये टी.व्ही. आणि मोबाईलचे आकर्षण वाढत आहे. मूल त्रास देत असल्यास त्याचे मन रमवायला हवे म्हणून पालकच त्यांच्या हातात थेट अॅन्ड्रॉईड मोबाईल किंवा टी.व्ही.चा रिमोट देऊन मोकळे होतात. यामुळे मात्र मुले गप्प होतात खरी; परंतु पुढे हीच धोकादायक साधने त्यांची आवड किंबहुना सवय बनून भावीपिढीची मन:शांती ढळण्याचे प्रमुख कारण बनण्याचा धोका बळावला आहे. त्यावरील नियंत्रण आणि उपचार, यासंबंधी वाशिम येथील सामाजिक कार्यकर्ते, कुपोषणमुक्ती, माता-बाल आरोग्याच्या प्रश्नांवर सातत्याने कार्य कारणारे बालरोग तज्ज्ञ डॉ. हरीष बाहेती यांच्याशी साधलेला हा संवाद...
लहान मुलांमध्ये चिडचिडपणा हल्ली वाढतोय, याबाबत काय सांगाल?
लहान मुले चिडचिड करतात, जिद्दीपणा करतात; तर त्यास पालकच जबाबदार आहेत. टी.व्ही. आणि अॅन्ड्रॉईड मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे मुलांकडे पुरेसे लक्ष पुरवायला पालकांना वेळच मिळेनासा झाला आहे. याशिवाय मुलांचे मन रमविण्यासाठी त्यांच्या हाती मोबाईल दिला जातो. कालांतराने हीच मुले मोबाईल सोडतच नाहीत. सातत्याने टी.व्ही.समोरच लागून असतात, त्यांना वेळकाळच काय; पण भुकेचेही भान राहत नाही, अशी पालकांचीच तक्रार राहते.
आरोग्यासंबंधी आधीची आणि सद्य:स्थिती कशी विषद कराल?
साधारणत: दोन पिढ्यांआधी व्यक्ती वयाची नव्वदी सहज पार करायचा. अर्थात त्यांच्या गरजा मर्यादित होत्या. सुटसुटीत दिनक्रम, परिपूर्ण आहार आणि सांस्कृतिक वारशाच्या जपणूकीमुळे त्या काळातील माणसांची मने समाधानी असायची. गत काही वर्षांमध्ये मात्र मानसिक, शारिरीक, सामाजिक आणि अध्यात्मिक स्वास्थाकडेही लोकांचे दुर्लक्ष होत आहे. तथापि, पुर्वीच्या काळातील लोकांचे तत्व, जीवनपद्धती आणि संस्कृती अंगीकारण्याची वेळ ओढवल्याच्या निष्कर्षाप्रत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आले आहेत.
माता-बाल आरोग्यासंबंधी काय सांगाल?
सुदृढ आरोग्याचा खरा प्रवास जन्मापूर्वीच सुरू होतो. मातेच्या गर्भात वाढणाºया बाळाला आईच्या रक्तातून पोषक घटक मिळतात. परंतु, अशा पोषक घटकांसोबत काही आजारही संक्रमित होऊ शकतात. असे घडू नये, याकरिता तज्ञांकडून गर्भवतींची नियमित तपासणी होणे आवश्यक ठरते. रुबेला, सिकलसेल अॅनिमिया असे संक्रमित आजार पुढील पिढीत जडू शकतात. त्यामुळे नियमित तपासणीसह आहाराचे नियोजन गर्भवतींसाठी गरजेचे ठरते, अन्यथा रक्तक्षय, थायरॉईड ग्रंथींशी संबंधित विकार होऊन गर्भाची वाढ व विकासाबाबत समस्या निर्माण होऊ शकतात.