आधुनिक गाडगेबाबा ‘देविदास’ राखतोय आठवडी बाजाराची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 02:50 PM2020-02-17T14:50:44+5:302020-02-17T14:51:07+5:30
देविदास मसराम हे गृहस्थ कोणताही मोबदला न घेता आठवडयातून दोनवेळा संपूर्ण काडी, कचरा, घाण. प्लास्टिक कचºयाची विल्हेवाट लावून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचा उपक्रम दोन वर्षांपासून राबवत आहेत.
- नरेश आसावा
लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी (वाशिम): गावातील आठवडी बाजारात येणारे ग्राहक, व्यावसायिकांना घाणीमुळे त्रास होऊ नये, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये आणि गावाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून इंझोरी येथील आदिवासी समाजातील स्वच्छाग्रही देविदास मसराम हे गृहस्थ कोणताही मोबदला न घेता आठवडयातून दोनवेळा संपूर्ण काडी, कचरा, घाण. प्लास्टिक कचºयाची विल्हेवाट लावून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचा उपक्रम दोन वर्षांपासून राबवत आहेत. या कामगिरीमुळेच ते आधुनिक गाडगेबाबा ठरत आहेत.
कुठल्याही आठवडी बाजार आटोपला की, त्या परिसरात काडी, कचरा सडलेली फळे, खराब झालेला भाजी पाला, खाऊचे कागद, आदि कचरा सहज आढळतो. आठवडाभर हा कचरा कुजल्याने दुर्गंधी सुटते, जंतूसंसर्गाची भीती निर्माण होते, तसेच परिसराला ओंगळ रुपही प्राप्त होते. अशा ठिकाणी सहसा कोणीही खरेदी करायला किंवा दुकान थाटायला तयार होणार नाही; परंतु नाईलाजास्तव बरेच ठिकाणी असे प्रकार होतातच. इंझोरीचा आठवडी बाजारही याला अपवाद नाही. दर गुरवारी येथे आठवडी बाजार भरतो. मानोरा तालुक्यातील २५ ते ३० गावांसह बाहेरच्या तालुक्यातील हजारो लोक येथे बाजाराला येतात. इतर बाजाराप्रमाणेच इंझोरीचा बाजारही आटोपला की, कचरा, घाण पसरते. ही बाब आपल्या गावासाठी निश्चितच चांगली नाही, तसेच या कचºयामुळे येथे येणाºया ग्राहकांसह व्यावसायिकांच्या आरोग्यावर परिणामही होऊ शकतो, ही बाब इंझोरी येथील देविदास मसराम यांच्या मनात खोलवर रुजली. त्यातूनच त्यांनी दोन वर्षांपूर्वी या बाजारात आठवड्यातून दोन वेळा एकट्यानेच स्वच्छता अभियान राबविणे सुरू केले. इंझोरीचा आठवडी बाजार गुरुवारी भरतो. त्यामुळे या दिवशी भल्या पहाटे सकाही ५ वाजतापासूनच देविदास हाती झाडी घेऊन या आठवडी बाजारातील घाण, कचरा झाडूने साफ करतात आणि त्याची विल्हेवाटही लावतो. बाजाराच्या दुसºया दिवशी शुक्रवारीही ते हाच उपक्रम पुन्हा राबवून गावकºयांना दुर्गंधीपासून आणि आजारांपासून वाचवितात. या कृत्यामुळे देविदास मसराम हे इंझोरीवासियांसाठी आधुनिके गाडगेबाबाच ठरले आहेत.