ओबीसींना न्याय, सन्मान देण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
By नंदकिशोर नारे | Published: October 13, 2023 04:37 PM2023-10-13T16:37:26+5:302023-10-13T16:37:38+5:30
बंजाराकाशीत ओबीसी जागर यात्रेचा पहिल्या टप्प्यातील समारोप
वाशिम : काँग्रेसच्या काळात केंद्रीय मंत्री पी. चिदंम्बरम यांनी लोकसभेत म्हटले होते की, देशात एस.सी.एस.टी. शिवाय कोणत्याही जातीची गणना केली जाणार नाही आणि तेच काँग्रेस आज म्हणते की, ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, ओबीसी जनगणलेला भाजपाचा कधीच विरोध नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपा सरकार विमुक्त भटके आणि ओबीसींना न्याय सन्मान मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बंजाराकाशी पोहरादेवी येथे शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी ओबीसी जागर यात्रेच्या पहिल्या टप्प्यातील समारोप कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ओबीसींची जेवढी चिंता पंतप्रधान मोदींनी केली तेवढी चिंता कोणी केली नाही, मंडल आयोगाला भाजपाने समर्थन केले. मात्र उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. प्रधानमंत्री मोदी ओबीसी समाजातील आहेत. त्यामुळे सर्व ओबीसी त्यांच्या पाठीशी आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धर्मपीठ प्रमुख बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज, यशवंत महाराज उमरी, केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार आशिष देशमुख, माजी खासदार हंसराज अहिर, खासदार भावना गवळी, खासदार वाघमारे, रामदास तडस, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार निलय नाईक, वसंत खंडेलवाल, रणधीर सावरकर, प्रतापदादा अडसड, माजी खासदार अनंतराव देशमुख, माजी मंत्री रणजित पाटील, प्रवीण पोटे, माजी आमदार अनंतकुमार पाटील, ओबीसी सेलचे वाशिम जिल्हाध्यक्ष बाळू मुरकुटे, राजू पाटील राजे, देविदास राठोड, माजी आमदार विजय जाधव, आमदार श्वेता महाले, धम्मपाल मेश्राम, महादेव सुपारे, डॉ. संजय कुटे, खासदार डॉ.उमेश जाधव आदि उपस्थित होते. स्वागतपर भाषण आमदार राजेंद्र पाटणी यांनी, प्रास्ताविक भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांनी, तर संचलन भाजपाचे प्रदेश सचिव जयंत डेहनकर यांनी केले.
राहुल गांधींची मोहब्बत की दुकान बंद होईल
राहुल गांधी यांनी मोहब्बत की दुकान उघडली पण प्रेम दुकानात मिळत नाही म्हणून हे दुकान बंद होईल. मोदी यांनी ज्या योजना सुरू केल्या त्या सर्व योजनेचे लाभार्थी एस.सी,एस.टी.आणि ओबीसीचे आहेत. सामाजिक न्यायाच्या गोष्टी विरोधी पक्ष करतात; मात्र भाजपाच्या केंद्र सरकारमध्ये मागासवर्गीय आणि ओबीसींचे जास्त मंत्री आहेत, असेही ते म्हणाले.