गुडमॉर्निग पथकातील कर्मचा-यांना पैशाची मागणी!
By admin | Published: March 19, 2017 02:36 AM2017-03-19T02:36:52+5:302017-03-19T02:36:52+5:30
मंगरुळपीर नगरपरिषद कार्यलय अधीक्षकाचा प्रताप.
मंगरुळपीर (जि. वाशिम), दि. १८- : मंगरुळपीर शहराची हगणदरीमुक्तीकडे वाटचाल सुरु असताना नगरपरिषदेच्या कार्यलय अधिक्षक तथा अभियंत्याने गुडमॉर्निग पथकातील सहा कर्मचार्यांना पाच हजार रुपये घेऊन येण्याच्या सुचना दिल्याचा प्रकार येथे घडला आहे.
मंगरुळपीर शहर हगणदरी मुक्त करण्यासाठी प्रभारी मुख्याधिकारी प्रमोद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेतील विविध विभागतील अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. १७ मार्च रोजी रात्रीच्यावेळी मंगरुळपीर नगरपरिषदेचे वीज अभियंता तथा कार्यालय अधीक्षक यांनी मंगरुळपीर येथील ओपन डिफीकेशन फ्री (ओडीएफ) टिमच्या ह्यव्हॉटस अँपह्ण गृपवर चित्रफित काढून पाच कर्मचार्यांची नावे घेऊन सर्वांनी उद्या सकाळी येतांना सोबत ५ हजार रुपये घेऊन येण्याच्या सूचना केल्यात. सदर सुचना करताना त्यांनी सदर आदेश मुख्याधिकारी साहेब यांचे असल्याचे सांगितले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने याबाबत अनेक तर्कविर्तक लावल्या जात आहेत. या संदर्भात मंगरुपीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रमोद वानखडे यांच्याशी संपर्क केला असता अशा प्रकारे कोणालाही सांगण्यात आले नाही. या प्रकरणाची चौकशी करुन संबधित कर्मचार्याला खुलासा मागण्यात येणार असल्याचे सांगितले.
ओडीएफ टीममधील कर्मचार्यांवर आपण तब्बल चार महिन्यापासून खर्च करीत आहे. दोन महिन्यांपासून पगार झाला नव्हता गत दोन दिवसाआधी पगार झाल्याने सगळयांना मी सूचना केल्या आहेत.
प्रकाश गणेशपुरे
नगरपरिषद वीज अभियंता तथा कार्यालय अधीक्षक
मंगरुळपीर नगरपरिषद, वाशिम