बँक व्यवस्थापकाकडून मुद्रा योजनेची चेष्टा!
By admin | Published: October 14, 2015 01:57 AM2015-10-14T01:57:17+5:302015-10-14T01:57:17+5:30
मंगरुळपीर येथील प्रकार; मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी.
मंगरुळपीर (जि. वाशिम): औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी शासनातर्फे उदात्त हेतूने सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान मूद्रा योजनेची चेष्टा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा व्यवस्थापकाकडून होत असल्याची तक्रार, मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. मित्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर कांबळे यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे ही तक्रार केली आहे. गंगाधर कांबळे यांनी मु्ख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे, की मित्रा (महादलित इंडस्ट्रियल टेंडन्सी रिफॉर्मिस्ट असोसिएशन) या उद्योजकीय संघटनेव्दारे मार्च २0१५ ते मार्च २0१६ पर्यंत एक वर्ष कालावधीचे औद्योगिक साक्षरता अभियान संपूर्ण राज्यभर राबविल्या जात असून, विविध उपक्रमाव्दारे उद्योगाला चालना देणार्या मानसिकतेविषयी जनजागृती केल्या जात आहे. मुद्रा योजनेची विस्तृत माहिती सामान्य जनतेला देता यावी म्हणून आपण स्वत: बँक ऑफ महाराष्ट्रच्या मंगरुळपीर येथील शाखा व्यवस्थापकांची भेट घेतली असता. त्यावेळी त्यांनी माहिती देणे टाळले, शिवाय आपल्याशी उध्दटपणे संवाद साधून मुद्रा योजनेची चेष्टा केली. पंतप्रधान मुद्रा योजना बेरोजगारीवर मात करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणारी आहे. शासनाने सिडबी ऐवजी प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकाकडे या योजनेचा कारभार सोपविल्यामुळे एक दिलासाही मिळाला आहे; परंतु बँक ऑफ महाराष्ट्रच्या मंगरुळपीर येथील शाखेचे व्यवस्थापक या योजनेची टर उडविणार्या भाषेचा वापर करून माहिती घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला अपमानजनक वागणूक देत आहेत. आपल्यासारख्या व्यक्तीसोबत असे घडते, तर हे व्यवस्थापक सामान्य नागरिकांशी यापेक्षाही वाईटपणे वागत असतील, हे स्पष्ट होते. शासनाने अशा बँक व्यवस्थापकावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही कांबळे यांनी मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. मुद्रा योजनेसंदर्भात माहिती देण्याचे काम योग्य पद्धतीने केले जात आहे. या योजनेचे उदिष्ट पूर्ण झाले असून, पुढील टप्यात येणार्या शासकीय निधीमधून अनेकांना व्यावसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे बँकेचे शाखा व्यवस्थापक गिरीश राऊत यांनी स्पष्ट केले.