लघू उद्योगासाठी मुद्रा योजना फायदेशीर!
By admin | Published: March 22, 2017 03:02 AM2017-03-22T03:02:14+5:302017-03-22T03:02:14+5:30
तहसीलदारांचे प्रतिपादन ; रिसोड येथे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा.
रिसोड, दि.२१- मुद्रा योजनेतून सहज व कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असल्याने ही योजना स्वत:चा लघू उद्योग उभारण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. गरजू, होतकरू बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घेऊन आपला उद्योग, व्यवसाय सुरु करावा, असे आवाहन तहसीलदार अमोल कुंभार यांनी केले. जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा अग्रणी बँक व रिसोड तहसीलदार कार्यालयाच्यावतीने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी विजय खंडारे होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक विजय नगराळे, अलाहाबाद बँकेचे व्यवस्थापक प्रदीपकुमार मिश्रा, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सौरभ देशमुख, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप आदी उपस्थित होते. तहसीलदार कुंभार म्हणाले की, प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतून लघू व्यवसाय व उद्योग उभारणीसाठी तसेच ते त्यांचा विस्तार करण्यासाठी कर्ज उपलब्ध करण्यात येते. या योजनेविषयी युवकांना माहिती मिळावी, याकरिता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून माहिती प्राप्त करून घेऊन, आपल्या व्यवसायाची निवड करून बँकेकडे परिपूर्ण अर्ज सादर करावा, असे सांगितले. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नगराळे म्हणाले की, जिल्ह्यातील होतकरू बेरोजगार युवक-युवतींना प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज मिळावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून मुद्रा कर्ज मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असून, जास्तीत जास्त लोकांपयर्ंत मुद्रा योजनेची माहिती पोहोचविणे हा मेळाव्यांचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. नाबार्डचे खंडारे म्हणाले, बेरोजगार, होतकरू युवकांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे युवकांनी समाजाची गरज ओळखून व्यवसायाची निवड करावी व त्यानुसार उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी बँकेकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन केले.
यावेळी अलाहाबाद बँकेचे व्यवस्थापक मिश्रा यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज घेऊन व्यवसाय सुरु केलेल्या अल्ताब हुसेन व विशाल राठोड या युवकांनीही यावेळी आपले अनुभव कथन केले.