पिल्लाला वाचविण्यासाठी माकडाची धडपड ठरली निष्फळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:13 IST2020-12-11T17:13:52+5:302020-12-11T17:13:59+5:30
Risod News पिल्लाला वाचविण्यासाठी आई व अन्य माकडांनी केलेली धडपडही निष्फळ ठरली.

पिल्लाला वाचविण्यासाठी माकडाची धडपड ठरली निष्फळ
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड: जिवंत विद्युत तारेवर उडी मारणाऱ्या माकडाच्या पिल्लाला विद्युत धक्का लागल्याने यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची घटना ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान घडली. दरम्यान, या पिल्लाला वाचविण्यासाठी आई व अन्य माकडांनी केलेली धडपडही निष्फळ ठरली.
बुधवारी सायंकाळी ५ वाजतादरम्यान एकतानगर येथे लगतच्या झाडावरून जिवंत विद्युत तारेवर उडी मारल्याने माकडाचे पिल्लू विद्युत धक्का लागल्याने तारेवर अडकून पडले. या पिल्लाला तेथून काढण्यासाठी अन्य माकडांची धडपड सुरू होती. या घटनेची माहिती स्थानिक रहिवासी वकील राठोड यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दिली. यावरून कंत्राटी कामगार अतुल पाटील थेर व शेख राहिल यांनी घटनास्थळी धाव घेत विद्युत प्रवाह बंद करण्याची सूचना वीज केंद्रातील कर्मचाऱ्याना दिली.
विद्युत प्रवाह बंद केल्यानंतर माकडाच्या पिल्लाला तारेवरून काढण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला असता, अन्य माकडांनी आक्रमक होत कर्मचाऱ्यांना झाडावर येऊ दिले नाही. दरम्यान, माकडाच्या आईने आपल्या पिल्ल्याला तारेवरून काढत खाली आणले व कवेत घेतले. यादरम्यान अन्य माकडांनी अवतीभोवती गर्दी केली. मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे उपस्थित नागरिकांचे डोळेही पाणावले होते.