मान्सूनपूर्व आढावा बैठक
By admin | Published: May 24, 2017 01:48 AM2017-05-24T01:48:20+5:302017-05-24T01:48:20+5:30
शासकीय विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना : कामचुकारांविरुद्ध कारवाईचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मान्सून काळात जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, जिल्ह्यातील मान्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवावा. त्यामुळे या आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळता येईल. आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची खबरदारी संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांनी घ्यावी. अन्यथा संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. जिल्ह्यातील सर्व पर्जन्यमापक यंत्रे तातडीने दुरुस्त करण्याच्या व मान्सूनपूर्व करावयाची कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, पाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग, नगरपरिषद, महावितरण आदी यंत्रणांच्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे यांनी मान्सूनपूर्व तयारीबाबत माहितीचे सादरीकरण केले.