वाशिम जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा दुपटीने वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाकडे मात्र पाठ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 03:41 PM2018-09-09T15:41:19+5:302018-09-09T15:41:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - जिल्ह्यात जुलै महिन्यात उद्दिष्टापेक्षा दुपटीने वृक्षारोपण करण्यात आले. मात्र, आता वृक्षसंवर्धनाची बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याने अनेक ठिकाणी वृक्षारोपण मोहिम केवळ औपचारिकेपुरती मर्यादीत राहत असल्याचे दिसून येते.
विविध कारणांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी राज्यशासनाच्यावतीने महत्त्वांकाक्षी ५० कोटी वृक्ष लागवड मोहिम जुलै महिन्यात राबविण्यात आली. वाशिम जिल्ह्याला १२.८३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले होते. प्रत्यक्षात २६.८७ लाख रोपांची लागवड करून विविध विभागांनी २०९ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. वृक्षारोपण मोहिम यशस्वी करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत शासकीय, निमशासकीय संस्था, कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेतल्याने दुपटीने वृक्षारोपण झाले. वृक्षारोपण मोहिम यशस्वी झाल्यानंतर काही मोजक्या विभागांचा अपवाद वगळता उर्वरीत विभागातर्फे वृक्षसंवधर्नाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येते. काही ठिकाणी तर रोपट्यांभोवती लावलेले संरक्षक कठडेही नाहीसे झाल्याचे दिसून येते. वृक्षारोपणासाठी जसा पुढाकार घेतला जातो, तसा पुढाकार वृक्षसंवर्धनासाठी प्रत्येक विभागाकडून घेतला जात नाही. परिणामी, वृक्षारोपणाच्या तुलनेत जीवंत रोपट्यांची संख्या कमी असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात १२.८३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना, प्रत्यक्षात २६.८७ लाख रोपांची लागवड करण्यात आली. सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षसंवर्धनाकडेही लक्ष दिले जात आहे. वेळोवेळी होणाºया बैठकीतूनही वृक्षसंवर्धन करण्याच्या सूचना दिल्या जातात. केवळ वृक्ष लागवड करून भागणार नाही तर वृक्षसंवर्धनही झाले पाहिजेत. सर्वांच्या सहकार्यातूनच वृक्षसंवर्धन मोहिम यशस्वी होऊ शकेल.
-अशोक वायाळ,
सहायक उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग वाशिम