गव्हापेक्षा ढेप महाग, चारा-पाणी महागले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:42 AM2021-04-20T04:42:08+5:302021-04-20T04:42:08+5:30
वाशिम : शेतकरी, पशुपालकांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, ढेपही महागल्याने आर्थिक अडचणीत आणखी भर पडली आहे. इंधन ...
वाशिम : शेतकरी, पशुपालकांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, ढेपही महागल्याने आर्थिक अडचणीत आणखी भर पडली आहे. इंधन दरवाढीसोबतच जनावरांचे चारा-पाणी महागल्याने ग्रामीण भागातील उपजीविका करणारे व्यावसायिक, दुग्ध उत्पादक यांची आर्थिक कोंडी झाली आहे. गव्हापेक्षा ढेपीचे भाव वाढल्याने जनावरांना खुराक कसे खाऊ घालणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुग्धोत्पादन व्यवसाय करत आहेत. दुभत्या व अतिमेहनतीचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्याचा कोंडा चारला जातो. यामुळे जनावरे सुदृढ राहून दूध जास्त देतात, असे पशुपालकांचे म्हणणे आहे. मात्र, वाढत्या महागाईचा फटका पशुधनालाही बसत आहे. शेतीला पूरक म्हणून जोडधंदा करू पाहणाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एकिकडे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव आहे तर दुसरीकडे जनावरांचा चारा-पाणीही महाग झाल्याने शेतकऱ्यांसह पशुपालकांची चिंता अधिकच वाढली आहे.
०००
बॉक्स..
खर्च व उत्पादनाचा ताळमेळ बसेना
शेतकरी, पशुपालकांना लागवड खर्च आणि उत्पादन यांचा ताळमेळ बसवताना हाती फारसे उत्पन्न पडत नसल्याचे दिसून येते. लागवड खर्च आणि उत्पादनातून मिळणारी रक्कम यात दिवसेंदिवस मोठे अंतर पडत आहे. ग्रामीण भागातील पशुधनासाठी लागणारे ढेप, मका, तूर, हरभरा, उडीद यांच्या दरात प्रामुख्याने वाढ झाली आहे. सरकी ढेप १,९०० ते २,००० रुपयादरम्यान केवळ ६५ किलोचे एक पोते, तर दुसरीकडे गव्हाचा भाव एक क्विंटलपर्यंत १,७०० ते १,९०० दरम्यान आहे. ढेप ३० ते ३१ रुपये तर गहू १७ ते १८ रुपये किलो मिळत असल्याने ढेप परवडत नाही. जनावरांना कसे खाऊ घालावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
०००००
दूध उत्पादकांच्या व्यथा
शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अनेक दुग्ध व्यावसायिकांनी चारा वाढल्याने पशुधन विक्रीचा निर्णय घेतला आहे. कारण शेतकऱ्यांना दुभत्या जनावरांना चारापाणी करणेसुद्धा कठीण जात आहे. उन्हाळ्यात तर हिरवा चारा मिळत नसल्याने दुभत्या जनावरांवरही परिणाम झाला आहे.
- पंजाबराव अवचार, शेतकरी
००००००
जनावरांचे चारापाणी महाग झाल्याने पशुधन जगवणे कठीण जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच सरकी ढेपही महाग होत असल्याने दुग्ध व्यावसायिकांसमोर आर्थिक पेच निर्माण होत आहे.
- अनिल अंभोरे, दुग्ध व्यावसायिक
०००००