सर आली धावून... राज्यातील २४९ तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक पाऊस
By दादाराव गायकवाड | Updated: September 2, 2022 17:00 IST2022-09-02T16:59:17+5:302022-09-02T17:00:35+5:30
जुलै, ऑगस्टमधील दमदार पावसाचा परिणाम

सर आली धावून... राज्यातील २४९ तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक पाऊस
वाशिम: राज्यात यंदा मान्सून विलंबाने दाखल झाला असला तरी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पावसाच्या सरासरीत कमालीची वाढ झाली असून, हवामान विभागाच्या अहवालानुसार १ सप्टेंबरपर्यंत राज्यातील ३५५ पैकी तब्बल २४९ तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.
मान्सून विलंबाने दाखल झाल्यानंतर जुलैपासून राज्याच्या विविध भागात पावसाने धुमाकूळ घातला, ऑगस्टमध्ये पावसाचा धडाका अधिकच वाढला. जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाची सरासरी खूप अधिक राहिली. ऑगस्टमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले, शिवाय जनजीवनही विस्कळीत झाले होते. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २४९ तालुक्यांत १ जूनपासून १ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या अहवालात नमूद आहे. शिवाय तर ९५ तालुक्यात ७५ ते १०० टक्क्यांपर्यंत पाऊस पडला आहे. शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस असलेल्या २४९ तालुक्यांत नांदेड (१६), यवतमाळ (१५), नागपूर (१४), नाशिक, अहमदनगर आणि चंद्रपूर (प्रत्येकी १३), पुणे (१२), गडचिरोली (११) आणि सांगली (१०) या नऊ जिल्ह्यातीलच ९१ तालुक्यांचा समावेश आहे.
११ तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस
एकीकडे ३५५ तालुक्यांपैकी २४९ तालुक्यात पावसाचे प्रमाण शंभर टक्क्यांपेक्षा अधिक असताना ११ तालुक्यात पावसाचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यात अकोला जिल्ह्यातील अकोट, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, नाशिकमधील इगतपुरी, जळगावमधील बोधवाडा, सोलापुरातील सांगाेळा, साताऱ्यातील महाबळेश्वर, कोल्हापुरातील चांदगड, राधानगरी आणि बावडा, तसेच परभणी जिल्ह्यातील परभणी आणि पथारी या दोन तालुक्यांचा समावेश आहे.