मोरगव्हाणवाडी ग्रामस्थांनी कोरोनाला दिला नाही गावात थारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:29 AM2021-06-03T04:29:27+5:302021-06-03T04:29:27+5:30
मोरगव्हाणवाडी गावाची लोकसंख्या साडेतीनशेच्या आसपास. गाव प्रारंभीपासूनच सांप्रदायी पंथाचे असल्याने सांप्रदायी धर्माची शिकवण नित्यनेमाची; परंतु मागील काही वर्षांपासून ...
मोरगव्हाणवाडी गावाची लोकसंख्या साडेतीनशेच्या आसपास. गाव प्रारंभीपासूनच सांप्रदायी पंथाचे असल्याने सांप्रदायी धर्माची शिकवण नित्यनेमाची; परंतु मागील काही वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे लाॅकडाऊन, कडक निर्बंध यामुळे सामूहिक भजन, कीर्तनाला ग्रामस्थांनी थांबा देत घराघरांतूनच भजन, नामस्मरणाला प्राधान्य दिले. परिसरातील अनेक गावांतील कोरोना रुग्णांचा वाढता आलेख तर अनेक गावांतील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडाही चिंताजनक होता. कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये म्हणून अनेकांनी उपाययोजनांवर तसेच शासनाच्या त्रिसूत्रीवर भर दिला. गावातील नागरिकांनी काेराेना नियमांचे तंताेतत पालन केल्याने मार्च महिन्यापासून ते आजपर्यंत आराेग्य विभागाच्या दफ्तरी एकही कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही. गावातील अनेक तरुण रोजगाराच्या शोधात अनेक औद्योगिक शहरांमध्ये आहेत. त्यांच्यापैकीसुध्दा कोणाला कोरोना विषाणूची बाधा झाली नाही हे विशेष. येथील काही ज्येष्ठांना गावाच्या आरोग्याविषयी विचारणा केली असता शुध्द सात्त्विक आहारच मानवी शराराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. तसेच काेराेना नियमांचे तंताेतत पालन केल्यास काेणतीच भीती नसल्याचे सांगितले.
.......................
माेरगव्हाणवाडीवासीयांनी या केल्या उपाययाेजना
कोरोना संसर्गाविषयी शासनाने ठरवून दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन, जंतुनाशक फवारणी करून गावात सतत जनजागृती केल्याने ग्रामस्थ सजग राहिले, घरगुती, आयुर्वेदिक काढे सतत घेत प्राथमिक उपाययोजनांवर ग्रामस्थ लक्ष देत असल्याची माहिती सरपंच अनंता कांबळे, ग्रामस्थ जगन्नाथ गरकळ यांनी दिली.