बहुतांश ई-क्लास जमिनीवर वृक्ष लागवडच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 05:28 PM2019-08-10T17:28:43+5:302019-08-10T17:28:50+5:30
काही ग्रामपंचायती अंतर्र्गत ई-क्लास जमिनीवर वृक्ष लागवड पूर्ण झालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात ४० लाख वृक्ष लावण्यात येत आहेत. ही मोहीम वेगात सुरू आहे; परंतु वृक्ष लागवडीसाठी सर्वात पुरक आणि फायदेशीर असलेल्या ई-क्लास जमिनीवर अद्याप वृक्ष लागवड पूर्ण झाली नसल्याचे दिसत आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी याची दखल घेऊन वृक्ष लागवडीला वेग देणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरण प्रेमींच्यावतीने व्यक्त होत आहे.
राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत वाशिम जिल्ह्यासाठी ४० लाख ३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी वृक्षरोपे उपलब्ध करण्याची जबाबदारी सामाजिक वनीकरण आणि वनविभागाकडे असून, या दोन्ही विभागांनी निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षरोपे उपलब्धही केली आहेत. जिल्ह्यात निर्धारित उद्दिष्टापैकी अधिकाधिक वृक्ष लागवड ही ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया ई-क्लास जमिनीवर होणार आहे. यासाठी सामाजिक वनीकरण विभागांतर्गत १० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले असून, ग्रामपंचायत निहाय उद्दिष्टही निश्चित करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी काही ग्रामपंचायतींनी ई-क्लासवर अधिकाधिक वृक्ष लागवडीसाठी लोकसहभाग वाढावा म्हणून विविध उपक्रमही राबविले आणि त्याचा मोठा फायदा झाला. अनेक ग्रामपंचायतींनी निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड जुलै महिन्यातच केली. तथापि, अद्यापही काही ग्रामपंचायती अंतर्गत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निम्मेही झाले नाही. मधल्या काळात पावसाने दडी मारल्याने वृक्ष लागवड मोहिमेत खोळंबा निर्माण झाला होता; परंतु आता जिल्ह्यात १० ते १२ दिवस सतत पाऊस पडला आणि तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीपही दिली आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीला वेग मिळणे अपेक्षीत होते; परंतु अद्यापही काही ग्रामपंचायती अंतर्र्गत ई-क्लास जमिनीवर वृक्ष लागवड पूर्ण झालेली नाही.
वृक्ष लागवडीचा सतत आढावा जिल्हाधिकारी घेत आहेत. पूर्वी पावसाअभावी आणि नंतर सततच्या पावसामुळे वृक्ष लागवड थांबली होती. आता वृक्ष लागवडीला वेग देण्यात आला असून, आमचे ६० टक्के उद्दिष्टही पूर्ण झाले आहे. नियोजित ई-क्लास जमिनीवर निर्धारित मुदतीपूर्वीच वृक्ष लागवड करण्यात येणार असून, यासाठी ग्रामपंचायतींना सुचनाही देण्यात आल्या आहेत.
-उत्तमराव फड
सहाय्यक वनसंरक्षक
सामाजिक वनीक रण, वाशिम