वाशिम जिल्हय़ातील बहुतांश शाळांमध्ये ‘तक्रारपेटी’चा नियम धाब्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 02:10 AM2017-12-25T02:10:22+5:302017-12-25T02:11:55+5:30
वाशिम: विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसविण्याचे आदेश मे २0१७ मध्ये दिले होते. वाशिम जिल्हय़ातील बहुतांश शाळांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने शुक्रवार व शनिवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरून समोर आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसविण्याचे आदेश मे २0१७ मध्ये दिले होते. वाशिम जिल्हय़ातील बहुतांश शाळांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने शुक्रवार व शनिवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरून समोर आले.
विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रयत्न म्हणून तसेच काही अडचणी, दडपण किंवा अन्य प्रकारच्या तक्रारी असतील तर सदर तक्रारी मांडण्याचे व्यासपीठ म्हणून प्रत्येक शाळेत दर्शनी भागात, प्रवेशद्वारानजीक किंवा सर्वांच्या नजरेत येईल अशा ठिकाणी तक्रार पेटी बसविण्यात यावी, असे आदेश शिक्षण विभागाने ५ मे २0१७ रोजी दिलेले आहेत. सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळामध्ये तक्रारपेट्या बसविण्याची आवश्यक कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, असे आदेशात नमूद आहे. या अनुषंगाने शाळा प्रशासन व व्यवस्थापनाने करावयाची कार्यवाही तसेच क्षेत्रीय यंत्रणांची जबाबदारीदेखील स्पष्ट केलेली आहे. शाळेच्या दर्शनी भागात बसविण्यात आलेली तक्रारपेटी पुरेशा मापाची व सुरक्षित असणे आवश्यक आहे. तक्रारपेटी प्रत्येक आठवड्यात कामकाजाच्या शेवटच्या दिवशी उघडण्यात यावी, तक्रारपेटी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, पोलीस प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडण्यात यावी तसेच तक्रारपेटीत प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची नोंद घेऊन तक्रार निवारण करण्याबाबत तत्काळ आवश्यक ती कार्यवाही व उपाययोजना करण्यात याव्या, असे शिक्षण विभागाचे स्पष्ट आदेश आहेत. सात महिन्याच्या कालावधीनंतर या आदेशाची अंमलबजावणी वाशिम जिल्हय़ातील शाळांमध्ये केली जाते किंवा नाही, याची पडताळणी म्हणून ‘लोकमत’ चमूने पाहणी केली असता, बहुतांश शाळांमध्ये अद्याप तक्रार पेटी बसविली नसल्याचे दिसून आले. तक्रार पेटीच नसल्याने तक्रार निवारणाची संपूर्ण प्रक्रियाच ठप्प असल्याचे स्पष्ट झाले. कारंजा तालुक्यातील जवळपास १२ शाळांची पाहणी केली असता, एकाही शाळेत तक्रारपेटी आढळली नाही. रिसोड तालुक्यातील १0 शाळांची पाहणी केली असता, एकाही शाळेत तक्रारपेटी आढळली नाही. राजुरा परिसरातील चार शाळा, वाशिम तालुक्यातील सहा शाळा, मंगरूळपीर तालुक्यातील तीन शाळा, मानोरा तालुक्यातील चार शाळा, शिरपूर परिसरातील दोन शाळांची पाहणी केली असता, कुठेही तक्रारपेटी बसविल्याचे दिसून आले नाही.
शासन निर्णयानुसार प्रत्येक माध्यमाच्या शाळांनी दर्शनी भागात तक्रार पेटी बसविणे बंधनकारक आहे. शाळांनी तक्रार पेटी बसवावी, अशा सूचना दिलेल्या होत्या. याउपरही कुणी तक्रार पेटी बसविली नसेल तर खुलासा मागविण्यात येईल. तक्रार पेटी बसविण्याच्या नियमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना शाळा प्रशासनाना दिल्या जातील.
- डॉ. देवीदास नागरे
शिक्षणाधिकारी
(माध्यमिक), वाशिम