सर्वदूर जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:42 AM2017-09-16T01:42:10+5:302017-09-16T01:42:26+5:30

वाशिम : शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत वाशिम जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांसह सर्वांनाच बर्‍याचअंशी दिलासा मिळाला. या पावसामुळे खरिपातील कपाशी आणि तुरीच्या पिकाला आधार मिळाला, तर दुसरीकडे उडीद आणि मूग उत्पादक शेतकर्‍यांची मात्र थोडीफार धावपळ झाली. रिसोड व वाशिम तालुक्यातून वाहणार्‍या पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेस् तुडुंब भरले. 

Mostly heavy rain | सर्वदूर जोरदार पाऊस

सर्वदूर जोरदार पाऊस

Next
ठळक मुद्देपैनगंगा नदीवरील बॅरेजेस तुडुंब तूर, कपाशीसह हळदीच्या पिकाला आधार 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत वाशिम जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांसह सर्वांनाच बर्‍याचअंशी दिलासा मिळाला. या पावसामुळे खरिपातील कपाशी आणि तुरीच्या पिकाला आधार मिळाला, तर दुसरीकडे उडीद आणि मूग उत्पादक शेतकर्‍यांची मात्र थोडीफार धावपळ झाली. रिसोड व वाशिम तालुक्यातून वाहणार्‍या पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेस् तुडुंब भरले. 
गत चार-पाच दिवसांपासून राज्यातील काही भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस, तर काही भागात केवळ ढगाळ वातावरण आहे. तीन-चार दिवसांपासून वाशिम जिल्ह्यातही काही भागात सायंकाळच्या वेळी ढगाळ वातावरण होते. मात्र, पाऊस पडत नसल्याने शेतकर्‍यांसह सर्वांचीच चिंता वाढली होती. गुरुवारी रात्रीपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. शुक्रवारी सकाळी पावसाचा जोर वाढला. सकाळी ९ ते १२ या वेळेत जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाल्याने गत आठवडाभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना बर्‍याचअंशी दिलासा मिळाला. वाशिम शहरासह मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा, रिसोड तालुक्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 
आतापर्यंत मालेगाव व वाशिम तालुक्यात सर्वात कमी पाऊस होता. शुक्रवारी वाशिम तालुक्यात संततधार झाल्याने ११ बॅरेजेस् तुडुंब भरली. यामुळे रब्बी हंगामातील सिंचनाच्या आशा पल्लवित होत आहेत. दुपारी १२ वाजतानंतर  पावसाचा जोर ओसरला. वादळवारा व विजांचा कडकडाट नसल्याने जिल्ह्यात कुठेही वित्त वा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

पाटबंधारे विभागाने दिला सतर्कतेचा इशारा..
वाशिम व परिसरात सकाळपासून संततधार सुरू असल्याने पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेस् हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. पाटबंधारे विभागाने पैनगंगा नदी तिरावरील तसेच बॅरेज परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बॅरेज पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ११ बॅरेजेस्चे गेट परिचलन करणे सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी नदीपात्रात पाण्याची वाढ होऊ शकते, असा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तविला आहे. ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊ नये, जनावरे नदीपात्रात सोडू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांनी नदीकाठावरील नागरिकांना तसेच संबंधित गावांत दवंडीद्वारे सावधानतेचा इशारा द्यावा, अशी सूचना जलसंपदा विभागाने केली. वरूड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळी, सोनगव्हाण, ढिल्ली, टणका, जयपूर या ११ बॅरेजमधून नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे, असे पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांनी स्पष्ट केले.
-

Web Title: Mostly heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.