दैव बलवत्तर म्हणून माय-लेकीचा वाचला जीव!
By संतोष वानखडे | Published: October 8, 2022 05:46 PM2022-10-08T17:46:20+5:302022-10-08T17:48:10+5:30
नाशिक येथे झालेल्या भीषण अपघातात वाशिम जिल्ह्यातील माय-लेकीचा सुदैवाने जीव वाचला.
वाशिम : नाशिक येथे झालेल्या भीषण अपघातप्रसंगीवाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लोणी येथील माय-लेकींना वेळीच जाग आल्याने त्या बसमधून बाहेर पडल्या. दैव बलवत्तर म्हणून माय-लेकी सुखरूप असल्या तरी ही दुर्घटना पाहून त्या कमालीच्या हादरून गेल्या. अनिता सुखदेव चौगुले (४०), किरण चौगुले (१३) अशी मायलेकीची नावे आहेत.
लोणी येथील सुखदेव चौगुले हे पत्नी, मुलीसह कामानिमित्त मुंबईला राहतात. त्यांचा विनोद नामक एक मुलगा हा गावी शेती करतो. दसरा सणानिमित्त अनिता चौगुले या मुलगी किरणसह गावी आल्या होत्या. सण साजरा केल्यानंतर त्या चिंतामणी ट्रॅव्हल्सद्वारे मुंबईला जात होत्या. दरम्यान, पहाटेच्या सुमारास ट्रक-ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झाला. झोपेत असताना अचानक मोठा आवाज झाल्याने अनिता चौगुले यांना जाग आली. बस आगीत सापडल्याचे पाहून घाबरलेल्या अनिता यांनी मुलीला झोपेतून जागे करीत जीव वाचवून कसेबसे त्या बसमधून बाहेर पडल्या. ही दुर्घटना पाहून त्या कमालिच्या हादरून गेल्या. मुलगा विनोद याने मोबाईलद्वारे आईशी संपर्क साधला असता, दैव बलवत्तर म्हणून आम्ही बचावलो, दोघीही सुखरुप आहोत, असे अनिता यांनी सांगितले.