गाढ झोपलेल्या तीन मुलांना सोडून आई घरातून बेपत्ता
By सुनील काकडे | Published: May 10, 2024 07:50 PM2024-05-10T19:50:43+5:302024-05-10T19:50:56+5:30
राजुरा येथील प्रकार : पतीची पोलिसांत धाव
सुनील काकडे/वाशिम : १०, ५ आणि २ वर्षे वय असलेल्या तीन चिमुकल्या मुलांची आई माया प्रकाश पंडित (३५, राजुरा) ही ९ मे रोजी घरात कुणालाही काहीच न सांगता निघून गेली. सर्वत्र शोध घेवूनही तिचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे अखेर पती प्रकाश पंडित यांनी १० मे रोजी मालेगाव पोलिसांत धाव घेवून फिर्याद दाखल केली.
प्राप्त माहितीनुसार, राजुरा (ता.मालेगाव) येथील प्रकाश पंडीत हा युवक गावोगावी फिरून हळद व मसाला विक्रीचा व्यवसाय करतो. या कामानिमित्त तो ९ मे रोजी सकाळी निघून गेला. त्यानंतर काहीच वेळात त्याची पत्नी माया ही देखील गाढ झोपेत असलेल्या तिन्ही चिमुकल्यांना न सांगता घरातून निघून गेली.
दरम्यान, कुटूंबियांनी मायाचा रात्री उशिरापर्यंत आणि १० मे रोजी पुन्हा सकाळपासून सर्वत्र शोध घेतला. नातेवाईकांनाही फोनद्वारे संपर्क साधून वास्तपुस्त केली. मात्र, तिचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे अखेर तिच्या पतीने मालेगाव पोलिसांत धाव घेवून फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिस मायाचा शोध घेत आहेत.
ट्रकमधून कारंजाकडे गेल्याची माहिती
कुटूंबियांकडून शोध घेतला जात असताना राजुरा-कुरळा मार्गावरील एका शेतकऱ्याने माया ही ट्रकमध्ये बसून कारंजाच्या दिशेने गेल्याची माहिती दिली. त्यावरून कारंजा परिसरातील नातलगांकडे मायाबाबत विचारपूस करण्यात आली. मात्र, ती आढळली नसल्याचे पंडीत यांनी फिर्यादीत नमूद केले.