आई गेली देवाघरी, निवृत्तीच मुक्या मुलीचा सांभाळ करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:27 AM2021-06-20T04:27:40+5:302021-06-20T04:27:40+5:30
दाढी-कटिंगचा व्यवसाय असलेल्या निवृत्ती आळणे यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यापैकी बाली नावाची मुलगी जन्मजात मुकी आहे; ...
दाढी-कटिंगचा व्यवसाय असलेल्या निवृत्ती आळणे यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यापैकी बाली नावाची मुलगी जन्मजात मुकी आहे; तर इतर दोन मुले धडधाकट आहेत. निवृत्ती आळणे यांनी स्वत:च्या सुखाचा कधी विचार न करता तिन्ही मुलांचा सांभाळ केला. मुलीला चांगले स्थळ शोधून तिचे लग्न लावून दिले; तर मुलाचेही लग्न झालेले असून तो पुणे येथे बायकाे, मुलांना घेऊन वास्तव्य करीत आहे. मुक्या असलेल्या बालीचेही एका पायाने दिव्यांग व मुक्या मुलासोबत लग्न झाले होते; मात्र नवरा मारझोड करणारा निघाला. त्यामुळे कालांतराने विभक्त व्हावे लागले. तेव्हापासून बापाला मुक्या मुलीचा आणि तिला वडिलांचाच आधार आहे.
निवृत्ती आळणे यांना उतारवयामुळे दाढी-कटिंगचे काम करता येणे अशक्य आहे. त्यामुळे पावसाचे पाणी गळत असलेल्या मोडक्यातोडक्या घरात वास्तव्य करीत असताना शासनाकडून निराधार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनावर बाप-लेकींचा उदरनिर्वाह सुरू आहे. अधूनमधून मानधन लांबल्यास दोघांवरही उपासमारीची वेळ ओढवते. आजारी पडल्यास दवाखान्यात लावण्याकरिता जवळ पैसे नसतात. असे असतानाही ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा’, याप्रमाणे निवृत्ती आळणे स्वत:सोबतच मुक्या मुलीचा सांभाळ करीत आहेत.