पहिल्या अपत्यासाठी मातांना मिळणार पाच हजार रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:43 AM2021-09-03T04:43:57+5:302021-09-03T04:43:57+5:30
वाशिम : दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील गर्भवती महिलांना संस्थात्मक प्रसूतीसाठी प्रोत्साहन म्हणून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत पहिल्या अपत्यासाठी ...
वाशिम : दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील गर्भवती महिलांना संस्थात्मक प्रसूतीसाठी प्रोत्साहन म्हणून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत पहिल्या अपत्यासाठी मातांना तीन टप्प्यांत पाच हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
अनेक गोरगरीब गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे, संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविणे आदी उद्देशाने केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे. १ जानेवारी २०१७ रोजी अथवा त्यानंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असून, नोकरदार महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ही योजना एकवेळ आर्थिक लाभाची असून पहिल्या जीवित अपत्यापुरतीच मर्यादित आहे.
०००००००००००००
तीन टप्प्यांत मिळणार पैसे
लाभाची पाच हजार रुपये रक्कम लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात तीन हप्त्यांत जमा केली जाते. मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसांत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर पहिला टप्पा, प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा आणि प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकाचे प्राथमिक लसीकरण झाल्यानंतर तिसरा टप्पा.
पहिला टप्पा १०००
दुसरा टप्पा २०००
तिसरा टप्पा २०००
०००००००००००००००
पात्रतेचे निकष काय?
दारिद्ररेषेखालील तसेच दारिद्ररेषेवरील महिला. पहिल्या अपत्याकरिता अनुदानाचा लाभ मिळतो. वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही.
०००००००
लाभासाठी कोठे करायचा संपर्क?
ग्रामीण क्षेत्र : संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तालुका अधिकाऱ्यांकडे अर्ज प्रक्रिया.
नगरपालिका क्षेत्र : एएनएम पात्र लाभार्थींना अर्ज देऊन हेल्थ पोस्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल.
००००००००००००
कोट
दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील गर्भवती मातांना पहिल्या अपत्यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत तीन टप्प्यांत पाच हजार रुपयांचे अनुदानाचा लाभ दिला जातो. जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम