नाफेड खरेदीसाठी हालचाली!
By admin | Published: June 8, 2017 02:16 AM2017-06-08T02:16:06+5:302017-06-08T02:16:06+5:30
आज बैठक: सहायक निबंधकांचे मार्केटिंग अधिकाऱ्यांना पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासकीय खरेदी केंद्रांवर ३१ तारखेच्या मुदतीपर्यंत तूर विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांची २ लाख ८४ हजार ५३७ क्विंटल तूर खरेदी करणे बाकी आहे. यासाठी शासनाने मुदतवाढ दिली असतानाही खरेदी अद्याप सुरू झाली नाही. यासंदर्भात चर्चा करून तत्काळ खरेदी जिल्हा सहायक निबंधकांनी केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांसह इतर संबंधितांची ८ जून रोजी वाशिम येथे बैठक आयोजित केली आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी ६ जून रोजी पाठविले आहे.
राज्य शासनाच्या २६ मे रोजीच्या निर्णयानुसार नाफेडच्या तूर खरेदीला ३१ मेपर्यंतची मुदतवाढ मिळाली होती. यानंतर जिल्ह्यातील बाजार समित्यांकडून नाव नोंदणी करून शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत तूर खरेदीसाठी टोकण देण्याचे कामकाज करण्यात आले. त्या कालावधित जिल्ह्यातील सहाही नाफेडच्या केंद्रावर आलेल्या तुरीपैकी २ लाख ८४ हजार ५३७ क्विंटल तुरीची मोजणी अद्यापही होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोषाचे वातावरण असून, शेतकरी व शेतकरी संघटना या तुरीची मोजणी न झाल्यास आंदोलन करणार असल्याच्या तक्रारी बाजार समित्यांकडे प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही या संदर्भातील तक्रारी आल्या आहेत. या पृष्ठभूमीवर ६ जून रोजी जिल्हा सहायक निबंधक कार्यालयात बाजार समितीच्या सचिवांची बैठक घेण्यात आली.
त्यामध्ये जिल्ह्यात तत्काळ नाफेड तूर खरेदी सुरू करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्यानुसार जिल्हा सहायक निबंधकांनी नाफेड तूर खरेदी तत्काळ सुरू करणे, आजपर्यंत खरेदी केलेल्या तुरीच्या रकमा जमा करणे, नाफेडने खरेदी केलेल्या तुरीच्या साठवणुकीची व्यवस्था व खरेदी करणाऱ्या सबएजंटच्या समस्यांवर विचार करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांसह एका बैठकीचे आयोजन केले आहे.
शेतकऱ्यांचे चुकारे करण्याबाबतही चर्चा
जिल्ह्यात नाफेडची खरेदी विविध कारणांमुळे वारंवार अडचणीत आल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाच, शिवाय खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून मिळाले नसल्याने त्यांचा खरेदीचा हंगाम संकटात सापडला आहे. या सर्व मुद्यांवर जिल्हा सहाय्यकांकडून गुरुवारी आयोजित बैठकीत चर्चा करून तोडगा काढण्यात येणार आहे. त्याशिवाय ज्या संस्थांमार्फत नाफेडची तूर खरेदी केली जात आहे. त्या संस्थांना फंड पुरविण्याबाबतही जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निकाली लागण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात तातडीने नाफेडची खरेदी सुरू करायची आहे. त्याबाबत नियोजन व चर्चा करण्यासाठी उद्या बैठकीचे आयोजन केले आहे. यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांसोबत विविध मुद्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल.
- रमेश कटके,
जिल्हा सहायक निबंधक, वाशिम