एमपीएससीचे विद्यार्थी गोंधळात; परीक्षांच्या तारखांचा लागला घोर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:50 AM2021-07-07T04:50:42+5:302021-07-07T04:50:42+5:30

वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना गत दोन वर्षांपासून नानाविध ...

MPSC students confused; Exam dates are horrible! | एमपीएससीचे विद्यार्थी गोंधळात; परीक्षांच्या तारखांचा लागला घोर !

एमपीएससीचे विद्यार्थी गोंधळात; परीक्षांच्या तारखांचा लागला घोर !

Next

वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना गत दोन वर्षांपासून नानाविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. परीक्षांचा तारखा वारंवार बदलल्या जात असल्याने विद्यार्थीही गोंधळात पडले आहेत.

प्रशासकीय क्षेत्रात चांगले करिअर घडविण्याचे स्वप्न उराशी बाळगून होतकरू, गुणवान विद्यार्थी मोठ्या संख्येने एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांकडे वळत आहेत. एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक निश्चित राहात नसल्याने विद्यार्थी गोंधळात सापडत आहेत. मराठा आरक्षण आणि कोरोनामुळे एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा सुमारे दोन वर्षांपासून पुढे ढकलल्या जात आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनस्थितीवर याचा विपरीत परिणाम होत आहे. परीक्षा नियोजित वेळेत होत नसल्याने विद्यार्थी नैराश्यात जात असल्याचेही दिसून येते. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही दोन वर्षे मुलाखत होत नसल्याने उमेदवारांमधून संताप व्यक्त केला जात आहे. यावर्षी एमपीएससीतर्फे स्पर्धा परीक्षा केव्हा घेतल्या जाणार? याबाबत कोणतेही वेळापत्रक नाही. त्यामुळे विद्यार्थी गोंधळात असून, एमपीएससीने निश्चित वेळापत्रक जाहीर करावे, असा सूर विद्यार्थ्यांमधून उमटत आहे.

००००००

यावर्षीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार?

एमपीएससीतर्फे यावर्षी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. एमपीएससी परीक्षांच्या भरवशावर असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तारखा केव्हा जाहीर होतात? याची प्रतीक्षा लागून आहे. परीक्षेचे वेळापत्रकच नसल्याने नैराश्य पसरत आहे.

००००

ऑनलाईन क्लास किती दिवस चालणार?

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निर्बंध लागू आहेत. यामध्ये क्लासेसला परवानगी न दिल्याने स्पर्धा परीक्षेचे क्लास सध्या ऑनलाईन सुरू आहेत. गेल्या दीड वर्षांपासून हेच सुरू आहे. त्यामुळे गैरसोय होत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून उमटत आहेत. क्लासेसला परवानगी केव्हा मिळणार, आणखी किती दिवस ऑनलाईन क्लास चालणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे.

००००००

विद्यार्थ्यांचे वय निघून चालले !

कोट

एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत तसेच वेळापत्रक निश्चित नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. परीक्षेचे वेळापत्रक निश्चित असायला हवे.

- स्वप्नील खंडारे, विद्यार्थी

.......

प्रशासकीय क्षेत्रात करिअर म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून वेळापत्रक निश्चित नसल्याने निराशेचे वातावरण आहे. यंदाही परीक्षा केव्हा होणार? हे अनिश्चित आहे.

- सुरज वानखेडे, विद्यार्थी

००००००००००००००

क्लास चालकही अडचणीत

कोट

कोरोनामुळे दीड वर्षांपासून स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसवरही निर्बंध आले. इतर उद्योग व व्यवसाय, कार्यक्रम सुरू आहेत. मात्र, क्लासेस सुरू नाहीत. त्यामुळे संचालकही अडचणीत सापडले आहेत. आता तरी क्लासेसला परवानगी मिळावी.

- नितीन बांडे

संचालक, खासगी क्लासेस

०००

अनलॉकच्या टप्प्यात इतर उद्योग, व्यवसाय, विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यास परवानगी आहे. मात्र, क्लासेसवर निर्बंध असल्याने संचालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा.

- प्रा. विलास बोरचाटे

संचालक, खासगी क्लासेस

Web Title: MPSC students confused; Exam dates are horrible!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.