महावितरणने गोळा केले ४७ हजार ग्राहकांचे मोबाइल क्रमांक
By admin | Published: July 6, 2017 01:16 AM2017-07-06T01:16:19+5:302017-07-06T01:16:19+5:30
कर्मचाऱ्यांचे यशस्वी प्रयत्न : विजेसंदर्भातील माहिती मिळणार ‘मोबाइल’वर
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महावितरणने जवळपास सर्वच ग्राहक सेवा ‘आॅनलाईन’ उपलब्ध केल्या असून त्या ग्राहकांना सहजरीत्या उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ‘महावितरण’च्याच माहिती व तंत्रज्ञान विभागाने ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त असणारे चार मोबाईल अॅप देखील विकसित केले आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील विद्यूत ग्राहकांचे मोबाईल क्रमांक गोळा करणे सुरू असून ५ जुलैपर्यंत २ लाख २० हजार २६४ ग्राहकांपैकी ४७ हजार ४४७ ग्राहकांचे मोबाईल क्रमांक गोळा झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी दिली.
महावितरणने विकसीत केलेल्या विविध स्वरूपातील मोबाईल अॅपव्दारे वीजबिल पाहणे, ते आॅनलाईन भरणे यासह इतरही वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बिल भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डसोबतच मोबाईल वॅलेट, कॅश कार्डचा वापर करता येतो. एकापेक्षा जास्त वीज कनेक्शन असतील तर ते एकाच खात्यातून हाताळता येतात.
विजेसंबंधीच्या सर्व प्रकारच्या तक्रारी नोंदविणे तसेच त्याची सोडवणूक झाली अथवा नाही, याची खातरजमा करता येते. यापुढे ग्राहकांना मोबाईलवर वीजबिलाचे संदेश पाठवले जाणार आहेत. त्यासाठी ग्राहकांना त्यांचे मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी नोंदविण्याची व ते अद्यावत करण्याची सुविधा या अॅपमध्ये देण्यात आलेली आहे. ज्या ग्राहकांचे रीडिंग महावितरणला मिळालेले नाही, अशा ग्राहकांना कंपनीकडून नोंदविलेल्या मोबाईलवर संदेश पाठविला जाईल. त्यानंतर ग्राहकांना आपल्या मीटरचा फोटो काढून रीडिंग नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल. यामुळे वीजबिलांमधील चुका कमी होऊन ग्राहक तक्रारीही कमी होतील. सेवांबद्दलचा अभिप्राय देखील नोंदविण्याची सोय त्यात असणार आहे. त्यानुषंगाने गेल्या काही दिवसांपासून जनमित्रांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच गावांमधील ग्राहकांचे अद्ययावत मोबाईल क्रमांक गोळा करणे सुरू असून आतापर्यंत ४७ हजार ४४७ ग्राहकांचे मोबाईल प्राप्त झाले असून इतर ग्राहकांनी स्वयंस्फूर्तीने आपापले मोबाईल नंबर महावितरणला देवून सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी केले आहे.