आसेगावचे महावितरण कार्यालय एक आठवड्यापासून कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 12:11 PM2020-12-27T12:11:50+5:302020-12-27T12:12:00+5:30
MSEDCL News कनिष्ठ अभियंता पदभार स्वीकारल्यापासून कार्यालयात आलेच नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव: पोलीस स्टेशन आसेगावअंतर्गत येणाऱ्या ३ पेक्षा अधिक गावांतील वीजपुरवठ्याची जबाबदारी असलेले आसेगाव वीज उपकेंद्राच्या अभियंत्याचे कार्यालय गेल्या आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून कुलूप बंद आहे. येथे नियुक्त करण्यात आलेले कनिष्ठ अभियंता पदभार स्वीकारल्यापासून कार्यालयात आलेच नाहीत. त्यामुळे विविध अडचणींमुळे शेकडो शेतकरी आणि हजारो ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
आसेगाव येथील वीज उपकेंद्रातून शेगी, कुंभी, वारा जहॉगिर या तीन फिडरद्वारे ३०पेक्षा अधिक गावांत वीज पुरवठा केला जातो. त्यात हजारो कृषिपंप जोडण्यांसह घरगुती जोडण्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून अनियमित वीजपुरवठ्यामुळे सिंचनात अडथळे येत आहेत, तर घरगुती वीजपुरवठाही खंडित होत आहे.
त्यामुळे ग्रामस्थांनाही अडचणींचा सामना करावा लागत असून, लघु व्यवसायावर परिणाम होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ग्रामस्थ, शेतकरी आसेगाव येथील कनिष्ठ अभियंत्याच्या कार्यालयात जात आहेत; परंतु हे कार्यालय गेल्या आठवडाभरापासून कुलूप बंद आहे. येथील कनिष्ठ अभियंत्यांची बदली झाल्यानंतर आठवडाभरापूर्वीच नव्या अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली; परंतु पदभार स्वीकारल्यानंतर ते कार्यालयात फिरकलेच नाहीत. या संदर्भात महावितरणच्या मंगरूळपीर उपविभागीय अभियंत्यांनाही कोणतीच माहिती नसून, कनिष्ठ अभियंता पूर्वसूचनेशिवायच अनुपस्थित असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. कनिष्ठ अभियंत्यांचे कार्यालयच बंद असल्याने आता समस्या कोणाकडे मांडाव्या आणि सुरळीत वीजपुरवठ्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आसेगाव परिसरातील शेतकरी आणि घरगुती वीजग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.
आसेगाव महावितरण कार्यालयात गत आठवड्यात नियुक्त कनिष्ठ अभियंत्यांच्या अनुपस्थितीबाबत आपणास कोणतीही कल्पना नाही. त्यांनी रजेबाबत कोणती सूचना किंवा पत्रही दिले नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून, कनिष्ठ अभियंत्यांच्या अनुपस्थितीचे कारण जाणून घेऊ.
-हिरालाल जांभूळकर,
उपविभागीय अभियंता, महावितरण मंगरुळपीर