थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणची व्यापक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:26+5:302021-06-18T04:28:26+5:30
महावितरण वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी बांधील असली तरी वीज ग्राहकांनी आपल्याकडील वीज देयकांचा नियमित आणि वेळेत भरणा ...
महावितरण वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी बांधील असली तरी वीज ग्राहकांनी आपल्याकडील वीज देयकांचा नियमित आणि वेळेत भरणा करायला हवा; परंतु तसे होताना दिसत नाही. त्यामुळे महावितरणला नाइलाजास्तव वसुलीसाठी मोहीम राबवावी लागते. याशिवाय महावितरणचा डोलारा चालवायचा असेल, तर वितरित केलेल्या प्रत्येक युनिटची वसुली होणे तेवढेच गरजेचे आहे. वाशिम जिल्ह्यात जून २०२१ पर्यंत विविध वर्गांतील ग्राहकांकडे तब्बल ७५.७९ कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने व्यापक मोहीम सुरू केली आहे. थकबाकीची १०० टक्के वसुली करण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी उपविभागनिहाय पथके नियुक्त केली असून, थकबाकीदारांकडून सहकार्य न मिळाल्यास कारवाई करण्याचा इशाराही महावितरणकडून देण्यात आला आहे.
-----------------
प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याला उद्दिष्ट
महावितरणच्या वीज बिलाची थकबाकी प्रचंड वाढल्याने वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. यात अधिकाधिक वसूल होण्याच्या उद्देशाने प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट नेमून दिले आहे. एवढेच नाही तर वसुली मोहिमा व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असल्याने या मोहिमेत कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही सहभागी करण्यात आले आहे.
----------------------
तालुकानिहाय थकबाकीचे उद्दिष्ट (कोटीत)
तालुका - उद्दिष्ट
कारंजा - १६.८९
मालेगाव - १०.०७
मं.पीर - १०.०५
मानोरा - ६.४४
रिसोड - ९.६९
वाशिम - २२.६५
---------------------
एकूण ७५.७९
-----------------
कोट : वाशिम जिल्ह्यास घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पाणीपुरवठा, पथदिवे व इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे असलेली वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी ७५.७९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत रात्रीचा दिवस करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आता वसुलीसाठीही कंबर कसली आहे. वीज ग्राहकांनी त्यांच्याकडील थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे. अन्यथा कारवाईचा पावित्रा घ्यावा लागेल.
-रत्नदीप तायडे,
कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम