महिला सक्षमीकरणासाठी महावितरणचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:40 AM2021-03-10T04:40:42+5:302021-03-10T04:40:42+5:30
१ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान राज्यभर महावितरणमध्ये कृषी ऊर्जा पर्व राबविण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून जागतिक महिलादिनी ...
१ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान राज्यभर महावितरणमध्ये कृषी ऊर्जा पर्व राबविण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून जागतिक महिलादिनी सुरक्षेचे व सामाजिक अंतराचे नियम पाळत परिमंडलातील महावितरणच्यावतीने कृषीपंपाची संपूर्ण थकबाकी भरून थकबाकीशून्य झालेल्या महिला ग्राहकांना त्यांच्या जवळच्या कार्यालयात, त्यांच्या घरी तसेच बांधावर जाऊन थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच जिल्ह्यातील महिला सरपंच असलेल्या ग्रामपंचायतीला भेटी देऊन तेथील सरपंचांना महाकृषी ऊर्जा अभियानाची माहिती देण्यात आली. कृषी धोरण २०२० अंतर्गत ग्राहकांना ६६ टक्क्यांपर्यंत असलेला फायदा सांगण्यात आला. थकबाकी वसुलीतून ग्रामपंचायतीचे होणारे ऊर्जा सक्षमीकरण व ग्रामपंचायतीला वसुलीतून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबतही सांगण्यात आले, तसेच गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कृषी धोरणाचा लाभ घ्यावा, याबाबत विनंती करण्यात आली, तसेच महिला दिनाच्या प्रसंगी महावितरण महाकृषी ऊर्जा अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत वसुलीला सहकार्य करणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील एका महिला सरपंचांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. वाशिम जिल्ह्यात ३१ ठिकाणी महावितरण महिला कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग नोंदवून अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, महिला बचत गटांचे मेळावे आयोजित करून त्यांना महावितरण कृषी धोरणाची माहिती देण्यात आली. बचत गटांना वीज बिल वसुलीतून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत माहिती देण्यात आली, तसेच महिला असलेल्या शेतकरी ग्राहकांनी महावितरणच्या या संधीचा लाभ घेण्याबाबत सांगण्यात आले.
..........
५ महिलांना कृषीपंप वीज जाेडणी
महिला शेतकऱ्यांमध्ये वाशिम जिल्ह्यातील ५ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. महिला ग्राहकांना महिला दिनाच्या पर्वावर प्राधान्याने नवीन कृषीपंप वीज जोडणी देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच महिला दिनाच्या पर्वावर थकबाकी वसूल करणाऱ्या परिमंडलातील महिला जनमित्र व ऊर्जामित्रांनाही गौरविण्यात आले आहे.