म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला; एकाचाही डोळा निकामी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 11:49 AM2021-06-15T11:49:10+5:302021-06-15T11:49:15+5:30
Mucomycosis : सुदैवाने आतापर्यंत एकाही रुग्णाला डोळा गमवावा लागला नाही.
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसिसही परतीच्या मार्गाला असून, सुदैवाने आतापर्यंत एकाही रुग्णाला डोळा गमवावा लागला नाही. दुसरीकडे आतापर्यंत चार रुग्णांची मृत्यू तर सात जणांनी या आजारावर मात केली आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनावर मात केल्यानंतरही बुरशीमुळे होणारा आजार अर्थात म्युकरमायकोसिसचे रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहेत. मुख, दात, डोळ्यांवर आणि मेंदूवर आघात करणाऱ्या या आजारांवर वेळीच उपचार न मिळाल्यास जिवावरही बेतू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ‘म्युकरमायकोसिस’चे २३ रुग्ण आढळले. यापैकी चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सात जणांनी या आजारावर मात केली. सध्या १२ जणांवर उपचार सुरू आहेत. अलीकडच्या काळात म्युकरमायकोसिसचे रुग्णही कमी संख्येने आढळून येत असल्याने म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला असल्याचे दिसून येते. कोरोनातून बरे झालो म्हणून रुग्णांनी काही दिवस तरी स्वत:ची अधिक काळजी घेतली पाहिजे. कोरोनातून सुटलो म्हणजे बचावलो, असे समजून गाफिल राहू नका, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी रुग्णांना दिला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे २३ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला तर सात जणांनी म्युकरमायकोसिसवर मात केली. वेळीच उपचार मिळाल्याने एकाही रुग्णाला डोळा गमविण्याची वेळ आली नाही.
- डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम