म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला; एकाचाही डोळा निकामी नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:53 AM2021-06-16T04:53:17+5:302021-06-16T04:53:17+5:30

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसिसही परतीच्या मार्गाला असून, सुदैवाने आतापर्यंत एकाही रुग्णाला डोळा गमवावा लागला नाही. दुसरीकडे आतापर्यंत चार ...

Mucomycosis on the way back; No one's eye is useless! | म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला; एकाचाही डोळा निकामी नाही !

म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला; एकाचाही डोळा निकामी नाही !

Next

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसिसही परतीच्या मार्गाला असून, सुदैवाने आतापर्यंत एकाही रुग्णाला डोळा गमवावा लागला नाही. दुसरीकडे आतापर्यंत चार रुग्णांची मृत्यू तर सात जणांनी या आजारावर मात केली आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनावर मात केल्यानंतरही बुरशीमुळे होणारा आजार अर्थात म्युकरमायकोसिसचे रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहेत. मुख, दात, डोळ्यांवर आणि मेंदूवर आघात करणाऱ्या या आजारांवर वेळीच उपचार न मिळाल्यास जिवावरही बेतू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ‘म्युकरमायकोसिस’चे २३ रुग्ण आढळले. यापैकी चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सात जणांनी या आजारावर मात केली. सध्या १२ जणांवर उपचार सुरू आहेत. अलीकडच्या काळात म्युकरमायकोसिसचे रुग्णही कमी संख्येने आढळून येत असल्याने म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला असल्याचे दिसून येते. कोरोनातून बरे झालो म्हणून रुग्णांनी काही दिवस तरी स्वत:ची अधिक काळजी घेतली पाहिजे. कोरोनातून सुटलो म्हणजे बचावलो, असे समजून गाफिल राहू नका, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी रुग्णांना दिला आहे.

००००००००००००००००००

अशी आहेत म्युकरमायकोसिसची लक्षणे

म्युकरमायकोसिस हा बुरशीमुळे होणारा आजार आहे. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये हा आजार आढळून येतो. ही बुरशी सर्वप्रथम नाका-तोंडातून शरीरात प्रवेश करते. त्यातून संसर्ग झाल्यानंतर रुग्णाला आधी सर्दी होऊ शकते. नाकाला व घशात सूज येऊन वेदना जाणवू लागतात. ताप व सायनोसायटिससारखा त्रास झाल्यामुळे डोकेदुखी सुरू होते. हिरड्यांवर सूज, पक्के दात अचानक पडणे, गाल बधीर वाटणे अशी लक्षणे दिसून येतात.

गाल, डोळे व दात दुखणे. असह्य डोकेदुखी, नाक, टाळूला बुरशीचा काळा चट्टा, चेहऱ्याच्या हाडाला असह्य वेदना, डोळा लाल होणे, दृष्टी कमी होणे, नाकातून रक्त येणे, ही लक्षणे आहेत. योग्य निदान व उपाययोजना झाल्यास वेळीच या जंतूंचा फैलाव थांबू शकतो.

००००००००००००००००००

जिल्ह्यात औषधींचा साठा उपलब्ध

सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या आजारावरील औषधी उपलब्ध नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना अकोला, नागपूर येथून औषधी आणावी लागली. काही रुग्णांनी तर अकोला, नागपूर, औरंगाबाद येथे जाऊन उपचार घेतले. लिपोसोमल एम्फोटिसिरीन बी इंजेक्शन, पोसोकोनाझोल टॅब्लेट यासह अन्य औषधींचा जिल्ह्यात सुरुवातीला प्रचंड तुटवडा होता. आता जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात औषधींचा साठा असल्याने आणि रुग्णसंख्याही कमी असल्याने घाबरण्याचे कारण नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.

०००००

एकाही जणाचा डोळा निकामी नाही !

जिल्ह्यात आतापर्यंत २३ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. उर्वरीत रुग्णांवर वेळीच उपचार मिळाल्याने एकाही रुग्णाला डोळा गमवावा लागला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

वेळीच उपचार मिळाल्याने सात रुग्णांनी म्युकरमायकोसिसवर यशस्वी मात केली आहे. सध्या १२ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चांगली आहे, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले. १९ रुग्णांपैकी सर्वच रुग्णांचे डोळे वाचविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.

००००

कोट बॉक्स

जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे २३ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला तर सात जणांनी म्युकरमायकोसिसवर मात केली. वेळीच उपचार मिळाल्याने एकाही रुग्णाला डोळा गमविण्याची वेळ आली नाही.

- डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

.......

ही घ्या काळजी

आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. जबडा, दात यांची नियमित स्वच्छता, बिटाडिन किंवा गरम पाण्याने गुळण्या कराव्या. मधुमेहावर नियंत्रण ठेवल्यास संसर्गाचा धोका टळतो, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहार, आराम, जीवनसत्त्वांचे सेवन करावे असा सल्ला जिल्हा रुग्णालयाच्या दंतरोग तज्ज्ञ डॉ. मंजुषा वराडे यांनी दिला.

०००००००

Web Title: Mucomycosis on the way back; No one's eye is useless!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.