‘म्युकरमायकोसिस’ परतीच्या मार्गावर; जिल्ह्यात २ रुग्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:27 AM2021-07-11T04:27:52+5:302021-07-11T04:27:52+5:30
दुसऱ्या लाटेत कोरोनानंतर रुग्ण, नागरिकांसमोर म्युकरमायकोसिसचे (बुरशीमुळे होणारा आजार) नवे संकट उभे ठाकले होते. मुख, दात, डोळ्यांवर आणि मेंदूवर ...
दुसऱ्या लाटेत कोरोनानंतर रुग्ण, नागरिकांसमोर म्युकरमायकोसिसचे (बुरशीमुळे होणारा आजार) नवे संकट उभे ठाकले होते. मुख, दात, डोळ्यांवर आणि मेंदूवर आघात करणाऱ्या या आजारावर वेळीच उपचार न मिळाल्यास जीवावरही बेतू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. म्युकरमायकोसिसने ११ मे रोजी जिल्ह्यात पहिला बळी घेतला. २० जूनपर्यंत म्युकरमायकोसिसचे रुग्ण अधिक संख्येने होते. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने आपसूकच ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णसंख्येतही घट आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनातून बरे झालो म्हणून रुग्णांनी काही दिवस तरी स्वत:ची अधिक काळजी घेतली पाहिजे. ‘म्युकरमायकोसिस’ परतीच्या मार्गावर असला तरी नागरिकांनी गाफील राहू नये, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.
०००००००००००००००००
म्युकरमायकोसिसची लक्षणे
- गाल, डोळे व दात दुखणे. असह्य डोकेदुखी.
- नाक, टाळूला बुरशीचा काळा चट्टा
- चेहऱ्याच्या हाडाला असह्य वेदना
- डोळा लाल होणे, दृष्टी कमी होणे
- नाकातून रक्त येणे.
.......
हा आजार कुणाला होतो?
मुख्यत: मधुमेही, ज्याच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढले आहे आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण, कोविडनंतर येणारी अशक्ती, बर्न्स, ल्युकेमिया, दीर्घकालीन स्टेरॉइड वापर, अयोग्य पोषण अशा व्यक्तींमध्ये धोका अधिक असतो.
०००
कोट बॉक्स
कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत घट आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम