मुद्रा योजनेच्या प्रचार, प्रसारासाठी भरघोष निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:09 PM2019-01-22T13:09:58+5:302019-01-22T13:10:18+5:30
वाशिम : प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा ग्रामीण, दुर्गम आणि अती दुर्गम भागात प्रभावीपणे प्रचार, प्रसार करण्यासाठी तसेच समन्वय करण्यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांना नियोजन विभागाने २१ जानेवारी रोजी ६.३५ कोटी रुपये वितरित केले आहेत.
वाशिम : प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा ग्रामीण, दुर्गम आणि अती दुर्गम भागात प्रभावीपणे प्रचार, प्रसार करण्यासाठी तसेच समन्वय करण्यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांना नियोजन विभागाने २१ जानेवारी रोजी ६.३५ कोटी रुपये वितरित केले आहेत. यामध्ये पश्चिम वºहाडातील अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यासाठी ५१ लाखांचा समावेश आहे.
गरीब, होतकरू तसेच बेरोजगारांना रोजगारासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना राबविली जात आहे. या योजनेचा ग्रामीण तसेच दुर्गम भागातील जनमानसात प्रभावीपणे प्रचार, प्रसार आणि समन्वय करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. प्रसार, प्रचार व समन्वय करण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधीबाबत मागणी प्रस्ताव जिल्हा समन्वय समितीने शासनाकडे पाठविले होते. त्या अनुषंगाने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्यातील ३६ जिल्ह्यांना प्रचार, प्रसार व समन्वय करण्यासाठी नियोजन विभागाने सहा कोटी ३५ लाख ९० हजार रुपयांचा निधी २१ जानेवारी रोजी वितरीत करण्यास मंजूरी दिली आहे. यामध्ये वाशिम व अकोला जिल्ह्यासाठी प्रत्येकी १५ लाख ४० हजार, बुलडाणा जिल्ह्यातील २१ लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे. जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समन्वय समितीने मान्यता दिलेल्या जिल्हास्तरीय आराखड्यानुसार व नियोजन विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर निधी खर्च करावा लागणार आहे. या निधीच्या खर्चाचा ताळमेळ ठेवण्याची तसेच खर्चाची माहिती वेळोवेळी शासनाला देण्याची जबाबदारी ‘नियंत्रक अधिकारी’ म्हणून संबंधित जिल्हाधिकाºयांवर सोपविण्यात आली आहे.
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा ग्रामीण, दुर्गम आणि अती दुर्गम भागात प्रभावीपणे प्रचार, प्रसार केला जात आहे. शासनाकडून प्राप्त निधी मार्गदर्शक सुचनांनुसार खर्च केला जाईल.
- दीपक कुमार मीना
प्रभारी जिल्हाधिकारी, वाशिम.