मुक्ती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांचा बुडून मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 01:23 AM2017-08-25T01:23:19+5:302017-08-25T01:23:44+5:30
मालेगाव: भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अशोक पखाले हे तालुक्यातील कोल्ही येथील लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या तलावात गुरुवारी सकाळपासून बेपत्ता असून, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अशोक पखाले हे तालुक्यातील कोल्ही येथील लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या तलावात गुरुवारी सकाळपासून बेपत्ता असून, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही.
भारत मुक्ती मोर्चाचे कार्य करण्यापूर्वी ते ८ वर्षे भारिप-बमसंचे मालेगाव तालुका अध्यक्ष होते. ते दररोज कोल्ही तलावात पोहण्यासाठी जात होते. गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान ते पोहण्यासाठी तालावावर गेले. त्यांच्यासोबत पोलीस पाटील काशिनाथ काटेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश कढणे, प्रल्हाद बुंदे आदी मित्र होते. तलावावर त्यांनी मित्रांना सांगितले की, आज त्यांना अस्वस्थ वाटत आहे. त्यामुळे ते पोहण्याऐवजी काठावर बसून आंघोळ करणार आहेत. त्यामुळे बाकीचे पोहण्यासाठी तलावात गेले. परत आले तर त्यांना पखाले तिथे दिसले नाहीत. त्यांनी घटनेची माहिती पखाले यांच्या नातेवाइकांना, पोलिसांना व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक दुपारी २ वाजता साहित्यासह घटनास्थळी आले; मात्र मनुष्यबळ नसल्याने कुणीही पाहणी करू शकले नव्हते. महान येथील बचाव पथकाला पाचारण करण्यात आल्यानंतर सदर पथकाने सायंकाळी ५ वाजतापासून शोध कार्य हाती घेतले. अंधार पडल्यामुळे रात्री ७.१५ वाजता शोध कार्य थांबविण्यात आले. तोपर्यंत पखाले यांचा शोध लागला नव्हता. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजतापासून महानचे पथक शोध कार्य सुरू करणार आहे.
-