पेरणीच्या तोंडावर मुगाच्या दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 03:26 PM2019-06-24T15:26:40+5:302019-06-24T15:27:28+5:30
बाजार समित्यांमध्ये मुगाचे दर वाढून ६ हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर पोहोचले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकरी खरीपाच्या पेरणीची घाई करीत आहेत. अशात बाजार समित्यांमध्ये मुगाचे दर वाढून ६ हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर पोहोचले आहेत. अर्थात बाजारात सध्या उन्हाळी मुगाची खरेदी होत असली तरी, पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करणाºया शेतकºयांना या दरवाढीमुळे दिलासा मिळाला आहे.
शासनाने गतवर्षीच्या हंगामात मुगाला ६ हजार ९७५ रुपये प्रति क्विंटलचे हमीदर घोषीत केले होते. तथापि, गतवर्षीच्या मुगाची खरेदी संपत आल्यानंतरही बाजारात मुगाचे दर ५ हजार ७०० रुपये प्रति क्विंटलच्या वर कधीच गेले नाहीत. अर्थात संपूर्ण हंगामात किमान हजार रुपये कमी दराने शेतकºयांना मुग विकावा लागला. त्यातही सुरुवातीच्या काळात या शेतमालाचे दर अवघे ४ हजार ८०० ते ५ हजार रुपये प्रति क्विंटलच होते. तथापि, विविध आर्थिक संकटांचा सामना करणाºया शेतकºयांना गरजा भागविण्यासाठी शेतमालाची विक्री करण्याशिवाय पर्यायच नव्हता. आता हंगाम सपंला असताना आणि खरीपाच्या पेरणीची तयारी सुरू असताना बाजार समित्यांत मुगाचे दर ६ हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर पोहोचले आहेत. त्यात कारंजा बाजार समितीत सोमवारी अर्थात बाजार व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी मुगाची खरेदी ६००५ रुपये प्रति क्विंटल दराने होत असल्याचे दिसले. बाजारात प्रामुख्याने उन्हाळी मुगाचीच खरेदी होत असली तरी, खरीपाच्या पेरणीसाठी बियाणे, खते विकत घेण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करणाºया शेतकºयांना या दरवाढीचा काही प्रमाणात तरी फायदा होणार आहे.